पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 23:05 IST2025-12-26T23:03:11+5:302025-12-26T23:05:28+5:30
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या कार्यक्रमानंतर घडलेल्या धक्कादायक प्रकाराचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या कार्यक्रमानंतर घडलेल्या धक्कादायक प्रकाराचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये पंतप्रधानांचा कार्यक्रम आटोपल्यानंतर लोक कार्यक्रम स्थळी ठेवलेल्या कुंड्या, पुतळे आणि पंतप्रधानांचे कटआऊट, होर्डिंग, बॅनर उचलून नेताना दिसत आहेत. ही घटना लखनौमधील प्रेरणा स्थळ येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित असलेल्यांपैकी अनेक लोक पंतप्रधानांचा पुतळा आणि होर्डिंग उचलून नेताना दिसले. लोक उघडपणे या वस्तू उचलून नेत असल्याचे दिसत होते. तसेच त्यांना कुणीही आडकाठी करत नव्हते. त्यामुळे ही पळवा पळवी आता सोसल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लखनौमधील राष्ट्रीय प्रेरणा स्थळाचं उदघाटन केलं होतं. मोदींच्या या दौऱ्यापूर्वी लखनौमध्ये मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली होती. कार्यक्रम भव्यदिव्य वाटावा यासाठी रस्त्याच्या कडेला फुलांच्या शेकडो कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र कार्यक्रम संपताच तिथे आलेल्या लोकांची नजर कुंड्यांवर पडली. त्यानंतर लोक या कुंड्या उचलून घेऊन जाऊ लागले. कुणी दुचाकीवरून तर कुणी कारमधूनसुद्धा कुंड्या घेऊन गेले. तर काही जण हातात उचलून डोक्यावरून कुंड्या घेऊन गेले. एवढंच नाही तर कार्यक्रम स्थळी असलेल्या कटआऊट्स, फोटो, बॅनरसुद्धा लोकांनी उचलून नेले.