Hindi Language Row:हिंदीच्या मुद्द्यावरुन दाक्षिणात्य राज्यांमध्ये पुन्हा एकदा वाद सुरु झालाय. भाषेच्या वादात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हिंदीला पाठिंबा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी पवन कल्याण यांनी हिंदी भाषा स्वीकारण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पवन कल्याण यांनी हिंदीचे समर्थन केलं आहे. पवन कल्याण यांनी पुन्हा लोकांना त्यांच्या भीतीवर मात करून हिंदी भाषा स्वीकारण्याचे आवाहन केले. हिंदीमध्ये भारतीय राज्यांमध्ये एकात्मता निर्माण करणारी शक्ती असल्याचेही त्यांनी म्हटले.
हैदराबादमध्ये बोलताना पवण कल्याण यांनी काही भारतीयांना हिंदी शिकण्यास लाज का वाटते असा सवाल विचारला. हेच लोक कामासाठी किंवा प्रवासासाठी स्वेच्छेने परदेशी भाषा शिकतात, असंही पवण कल्याण म्हणाले. "तुम्हाला हिंदी भाषा स्वीकारायला लाज का वाटते? आपले माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे तामिळनाडूचे होते, पण त्यांनाही हिंदी आवडत होती. ते म्हणायचे की भाषा ही हृदयाला जोडणारी माध्यमे आहेत. चला, त्यांच्या दृष्टिकोनातून हिंदी भाषा पाहूया. हिंदी कोणीही लादत नाहीये. फक्त ती समजून घ्या आणि स्वीकारा," असं पवण कल्याण यांनी म्हटलं.
"हिंदी ही काही अनिवार्य गोष्ट नाही. ही एक अशी भाषा आहे जी या देशातील सर्व राज्यांमधील लोकांना सहज समजू शकते. परदेशी लोक आपली भाषा शिकू शकतात. जेव्हा आपल्याला कामासाठी जर्मनीला जावे लागते तेव्हा आपण जर्मन शिकतो आणि जपानला भेट देण्यासाठी आपण जपानी शिकतो, मग आपण आपली स्वतःची हिंदी भाषा शिकण्यास का घाबरतो? भीती का? आपण द्वेष मागे सोडला पाहिजे. हा संकोच सोडला पाहिजे," असंही पवन कल्याण म्हणाले.
"जेव्हा राजकारणाचा विचार येतो तेव्हा काही लोक म्हणतात की हिंदी आपल्यावर लादली जात आहे. मला सांगा, हे कसे बरोबर आहे? जेव्हा आपण इंग्रजी स्वीकारू शकतो आणि तिला आधुनिक भाषा म्हणवून इंग्रजी शिकू शकतो, तर मग हिंदी का शिकू नये? त्यात काय चूक आहे?" असा सवाल कल्याण यांनी केला.
मातृभाषा आईसारखी, तर हिंदी आपल्या आजीसारखी
"आपण स्कृतिक अभिमानाला भाषिक कट्टरतेशी जोडू नये. मातृभाषा आपल्या आईसारखी आहे, तर हिंदी आपल्या आजीसारखी आहे. दुसरी भाषा स्वीकारल्याने आपली ओळख संपत नाही, उलट आपल्याला एकत्रितपणे पुढे जाण्याची संधी मिळते, असं पवन कल्याण यांनी म्हटलं होतं.