सव्वाशे कोटी भारतीयांचं नाव बदलून राम ठेवा; हार्दिक पटेलांचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 10:46 IST2018-11-15T11:02:17+5:302018-11-17T10:46:43+5:30

नामांतराच्या मुद्यावरुन हार्दिक पटेल यांची भाजपावर जोरदार टीका

patidar leader hardik patel slams bjp for changing names of cities and districts | सव्वाशे कोटी भारतीयांचं नाव बदलून राम ठेवा; हार्दिक पटेलांचा भाजपाला टोला

सव्वाशे कोटी भारतीयांचं नाव बदलून राम ठेवा; हार्दिक पटेलांचा भाजपाला टोला

लखनऊ: देशातील ज्वलंत मुद्दे बाजूला सारण्यासाठीच जिल्हा आणि शहरांची नावं बदलण्याची उठाठेव सुरू आहे, अशा शब्दांमध्ये पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. सीबीआयमधील अंतर्गत वाद, राफेल घोटाळा, आरबीआयची स्वायत्तता असे अनेक गंभीर विषय सध्या देशासमोर आहेत. मात्र या मुद्यांपासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आता राम मंदिराचा मुद्दा रेटला जात आहे. भाजपा आणि संघाकडून देशातील वातावरण गढूळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशा शब्दांमध्ये हार्दिक यांनी भाजपावर तोफ डागली. फक्त जागांची नावं बदलून देश संपन्न होणार असेल, तर 125 कोटी भारतीयांचं नाव बदलून राम ठेवा, असा टोलाही त्यांनी लगावला. ते उत्तर प्रदेशात एका सभेला संबोधित करत होते. 




उत्तर प्रदेशातील योगी सरकारनं काही दिवसांपूर्वीच अलाहाबाद आणि फैजाबादचं नामांतर केलं. अलाहाबादला प्रयागराज आणि फैजाबादला अयोध्या नाव देण्याच्या प्रस्तावाला उत्तर प्रदेश सरकारनं मंजुरी दिली. यावरुन हार्दिक पटेल यांनी सरकारवर निशाणा साधला. मुलभूत प्रश्नांपासून लोकांचं लक्ष विचलित व्हावं, यासाठी सरकार नामांतराचे उपद्व्याप करत असल्याची टीका त्यांनी केली. उत्तर प्रदेशात बेरोजगारी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हजारो तरुणांकडे रोजगार नाहीत, असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं.

भाजपाला निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराची आठवण झाल्याचं हार्दिक पटेल म्हणाले. राम मंदिराचा वापर भाजपाकडून केवळ मतांसाठी सुरू आहे. गुजरातच्या प्रत्येक गावात रामाचं मंदिर आहे. मात्र रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत रामाचं मंदिर नाही, असं हार्दिक यांनी म्हटलं. भाजपाला केवळ निवडणुकीपुरती रामाची आठवण होत असल्याची टीकाही त्यांनी केली. 

Web Title: patidar leader hardik patel slams bjp for changing names of cities and districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.