Pastor Bajinder Singh Convicted: ख्रिश्चन धर्मगुरू पाद्री बाजिंदर सिंग याला एका बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोहाली कोर्टाने त्याला ही शिक्षा सुनावली. यानंतर मोहाली कोर्टाभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. २०१८ च्या या प्रकरणाची शेवटची सुनावणी २८ मार्च रोजी झाली होती. त्यावेळी सर्व पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे न्यायालयाने बाजिंदर सिंगला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले होते. त्यानंतर आज न्यायालयाने बाजिंदर सिंगला शिक्षा सुनावली.
पंजाबमधील प्रसिद्ध पास्टर बाजिंदर सिंगवर काही दिवसांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चर्चेत आला होता. ख्रिश्चन धर्मगुरु बाजिंदर सिंग याच्यावर एका तरुणीने आरोप करत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. पीडितेने बजींदर सिंग तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा आणि अश्लील मेसेज पाठवायचा असा आरोप केला होता. त्यानंतर बाजिंदर सिंगकडे चौकशी सुरु करण्यात आली होती. मात्र आता २०१८ च्या बलात्कार प्रकरणात मोहाली न्यायालयाने बाजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
बाजींदरला न्यायालयाने तीन दिवसांपूर्वी दोषी ठरवलं होतं. यानंतर त्यांना पटियाला तुरुंगात ठेवण्यात आले. पीडित महिलेने परदेशात स्थायिक होण्याच्या बहाण्याने बाजींदरने आपल्या घरी नेल्याचा आरोप केला होता. जिथे तिच्यावर बलात्कार करतानाचा व्हिडिओ बनवण्यात आला. विरोध केल्यास तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकेन, अशी धमकीही त्याने दिल्याचे पीडित महिलेने म्हटलं होतं.
शिक्षा टाळण्यासाठी पास्टर बाजींदरने न्यायालयात बाजू मांडली. माझी मुलं लहान आहेत. पत्नी आजारी आहे. माझ्या पायात रॉड घातला आहे, त्यामुळे माझ्यावर दया करा, असं बाजींदर सिंगने म्हटलं. मात्र न्यायालयाने त्याचा युक्तिवाद फेटाळून लावला.
शिक्षा टाळण्यासाठी पास्टर बाजींदरने न्यायालयात बाजू मांडली. माझी मुलं लहान आहेत. पत्नी आजारी आहे. माझ्या पायात रॉड घातला आहे, त्यामुळे माझ्यावर दया करा, असं बाजींदर सिंगने म्हटलं. मात्र न्यायालयाने त्याचा युक्तिवाद फेटाळून लावला. हे प्रकरण सात वर्षांपासून दडपून ठेवलं होतं. पण माझे वकील, पोलीस आणि न्यायालयाने मला जीवदान दिले, असं म्हणत पीडितेने न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले. पीडितेने दावा केला की, तिच्यासारख्या इतर अनेक महिलांचे पास्टर बाजींदर सिंगने शोषण केले होते.