प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:35 IST2025-12-05T12:35:12+5:302025-12-05T12:35:47+5:30
सलग चौथ्या दिवशी 'इंडिगो'ची सेवा विस्कळीत; 'क्रू'ची कमतरता आणि तांत्रिक समस्यांमुळे विमान कंपनीचा मोठा निर्णय

प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगो एअरलाइन्सने प्रवाशांना मोठा झटका दिला आहे. सलग चौथ्या दिवशी कंपनी गंभीर ऑपरेशनल समस्यांशी झुंजत असल्याने, आज, ५ डिसेंबर रोजी दिल्लीतून होणारी त्यांची सर्व देशांतर्गत उड्डाणे मध्यरात्री १२ वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. दिल्ली एअरपोर्ट ऑपरेटर जीएमआरने याबाबत माहिती दिली आहे. केवळ दिल्लीच नाही, तर देशभरातून इंडिगोची तब्बल ६००हून अधिक विमाने आज रद्द होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हजारो प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.
सलग तीन दिवसांपासून गंभीर समस्या
इंडिगो गेल्या तीन दिवसांपासून कर्मचारी आणि तांत्रिक समस्यांसारख्या गंभीर ऑपरेशनल अडचणींचा सामना करत आहे. याचा थेट परिणाम कंपनीच्या वेळेवर विमानसेवा देण्याच्या क्षमतेवर झाला आहे. या समस्येमुळे गुरुवारी कंपनीने एकाच दिवसात ५५० उड्डाणे रद्द केली, ज्यामुळे त्यांची वेळेवर सेवा देण्याची क्षमता घसरून १९.७ टक्के इतकी नीचांकी झाली आहे.
Passenger Advisory issued at 11:10 Hours#DelhiAirport#PassengerAdvisory#DELAdvisorypic.twitter.com/dZBdrW5aob
— Delhi Airport (@DelhiAirport) December 5, 2025
आजचा आकडा ६०० पार
आज, ५ डिसेंबर रोजीही इंडिगो एअरलाइनला देशभरातून ६०० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागत आहेत. रद्द होणाऱ्या विमानांची ही संख्या मागील दिवसांपेक्षाही जास्त असल्याने, प्रवाशांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. दिल्ली एअरपोर्ट ऑपरेटर जीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, एअरलाइनमधील सततच्या ऑपरेशनल अडचणींमुळे आज रात्री १२ वाजेपर्यंत दिल्लीतून इंडिगोची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
या शहरांतील वाहतूक प्रभावित
रद्द झालेल्या विमानांमध्ये दिल्लीतून सर्वाधिक म्हणजेच २२५ उड्डाणे रद्द झाली आहेत. मुंबईतून १०४ तर बेंगळुरूतून १०२ उड्डाणे आज होणार नाहीत. तसेच, हैदराबादमधून ९२, चेन्नईतून ३१, पुणे शहरातून २२ आणि श्रीनगरमधून १० विमानांचे उड्डाण आज होणार नाही. याव्यतिरिक्त, इतर लहान विमानतळांवरूनही काही उड्डाणे रद्द केली जात आहेत.
प्रवाशांमध्ये तीव्र संताप
सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या या विस्कळीत सेवेमुळे प्रवासी इंडिगोवर प्रचंड नाराज आहेत. अनेक प्रवासी एअरपोर्टवर तसेच सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी इंडिगो आणि एअरपोर्टची टीम ग्राउंडवर युद्धपातळीवर काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांनी आपल्या विमानाचा स्टेटस एअरलाइनकडून निश्चित तपासावा. या संपूर्ण समस्येचे निराकरण होण्यास अजून काही दिवसांचा अवधी लागू शकतो.