'सभागृहाचा मान राखा! कारवाई करावी लागेल'; सभागृहात फोटो काढणाऱ्या खासदारावर ओम बिर्ला संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 17:53 IST2025-12-03T17:48:26+5:302025-12-03T17:53:26+5:30
संसदेत मोबाईलवर क्लिक करणाऱ्या खासदारावर ओम बिर्ला चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.

'सभागृहाचा मान राखा! कारवाई करावी लागेल'; सभागृहात फोटो काढणाऱ्या खासदारावर ओम बिर्ला संतापले
Lok Sabha Speaker Om Birla Angry On MP: संसद भवनात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून, यात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा आणि गदारोळ होत आहे. मात्र, बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला एका वेगळ्याच कारणावरून चांगलेच संतापलेले दिसले. संसदेच्या नियमांचे उल्लंघन करत सभागृहात मोबाईलने फोटो काढणाऱ्या एका खासदारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि भविष्यात असा प्रकार झाल्यास कारवाईचा इशारा दिला.
आरजेडी खासदारावर बिर्ला यांचा संताप
ही घटना त्यावेळी घडली, जेव्हा अधिवेशनादरम्यान काही खासदार सभागृहात मोबाईलने फोटो काढत होते. आरजेडीचे खासदार अभय सिन्हा यांनी असाच प्रयत्न केला असता, ओम बिरला त्यांच्यावर चांगलेच भडकले. "आज फोटो काढला आहे, पण यापुढे असा प्रकार घडल्यास मला कारवाई करावी लागेल. सभागृहाचा मान राखा," अशा शब्दांत बिर्ला यांनी सिन्हा यांना फटकारले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संसदेतील नियमांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
संसदेत फोटो/व्हिडिओ काढण्यास कठोर मनाई, नियम काय म्हणतात?
संसदेच्या दोन्ही सभागृहात, म्हणजेच लोकसभा किंवा राज्यसभा, कोणत्याही खासदार, पत्रकार किंवा इतर व्यक्तीला मोबाईल किंवा कॅमेरा वापरून फोटो काढणे, व्हिडिओ बनवणे किंवा थेट रेकॉर्डिंग करण्याची परवानगी नाही. संसदेच्या कामकाजाचे रेकॉर्डिंग केवळ लोकसभा टीव्ही, राज्यसभा टीव्ही किंवा संसद सचिवालयाने अधिकृत केलेल्या कॅमेऱ्यांद्वारेच केले जाते. इतर कोणत्याही उपकरणाद्वारे रेकॉर्डिंग करणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे.
सभागृहाच्या आत मोबाईलचा कॅमेरा चालू करणे, सेल्फी घेणे किंवा कोणत्याही प्रकारचा फोटो काढण्याचा प्रयत्न करणे हे आचारसंहितेचे उल्लंघन मानले जाते. अशा वेळी अध्यक्ष किंवा सभापती तात्काळ कारवाई करू शकतात. संसद परिसरात, सभागृहाबाहेर, काही ठिकाणी फोटो घेण्याची परवानगी असते, परंतु सुरक्षा-संबंधित क्षेत्रे, समिती कक्ष, खासदारांचे प्रवेशद्वार आणि इतर संवेदनशील ठिकाणी फोटो काढण्यास सक्त मनाई आहे.
पत्रकारांसाठीही कठोर नियम
पत्रकारांनाही संसदेच्या आतमध्ये केवळ संसद सचिवालयाने मंजूर केलेल्या ठिकाणांहूनच शूटिंग करण्याची परवानगी असते. नियमांचे उल्लंघन केल्यास चेतावणी, शिस्तभंगाची कारवाई, सभागृहातून बाहेर काढणे किंवा भविष्यातील प्रवेशावर बंदी घालणे यासारख्या कठोर उपाययोजना केल्या जाऊ शकतात.
संसद परिसरात श्वानावरुनही वाद
या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आणखी एका अनोख्या वादामुळे संसद चर्चेत आली होती. काँग्रेसच्या ज्येष्ठ खासदार रेणुका चौधरी त्यांच्या गाडीतून एका श्वानाला संसद परिसरात घेऊन आल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि यावरून बरीच चर्चा झाली होती. तेव्हाही 'संसद परिसरात पाळीव प्राणी आणण्यास परवानगी आहे का' यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.