"सगळी जबाबदारी नेहरूचीं आहे का? तुम्ही काय केले सांगा"; पहिल्याच भाषणात प्रियंका गांधींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 15:22 IST2024-12-13T14:39:09+5:302024-12-13T15:22:12+5:30

लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

Parliament Winter Session constitution debate Priyanka Gandhi also attacked Modi government for over Pandit Nehru | "सगळी जबाबदारी नेहरूचीं आहे का? तुम्ही काय केले सांगा"; पहिल्याच भाषणात प्रियंका गांधींचे टीकास्त्र

"सगळी जबाबदारी नेहरूचीं आहे का? तुम्ही काय केले सांगा"; पहिल्याच भाषणात प्रियंका गांधींचे टीकास्त्र

MP Priyanka Gandhi: केरळमधील वायनाड येथील काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. उत्तर प्रदेशातील हाथरस, उन्नाव आणि संभलसारख्या घटनांचा उल्लेख करत प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. सध्याच्या सरकारने संविधान कमकुवत करण्याचे काम केल्याचे प्रियांका गांधी म्हणाल्या. प्रियांका गांधी यांच्या भाषणाची जोरदार चर्चा सुरु झाली असून त्यांची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भाषणाशी करण्यात येत आहे. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख करत विरोधकांना टोला लगावला.

लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान पहिल्यांदाच खासदार प्रियांका गांधी यांनी भाषण केलं. 'आपल्या देशाला धर्माची जुनी परंपरा आहे, हजारो वर्ष जुनी, ही परंपरा संवाद आणि चर्चेची आहे. तत्त्वज्ञान ग्रंथ, वेद आणि उपनिषदांमध्ये एक गौरवशाली परंपरा आहे. वेगवेगळ्या धर्मांमध्ये, इस्लाम, जैन आणि शीख धर्मात वादविवाद आणि चर्चेची संस्कृती आहे. या परंपरेतून आपला स्वातंत्र्यलढा उभा राहिला. सत्य आणि अहिंसेवर आधारित हा जगातील एक अनोखा लढा होता. आपला स्वातंत्र्यलढा लोकशाहीवादी होता, ज्यात प्रत्येक वर्ग, जाती, धर्माच्या लोकांनी भाग घेतला आणि स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्या स्वातंत्र्यलढ्यातून एक आवाज उठला, तो आवाज आपल्या देशाचे संविधान आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

"ही केवळ कागदपत्रे नाहीत. या संविधानाच्या निर्मितीमध्ये अनेक नेते वर्षानुवर्षे मग्न राहिले. या संविधानाने प्रत्येक नागरिकाला सरकार बनवण्याचा आणि बदलण्याचा अधिकार दिला आहे. संविधानाच्या धारणेने प्रत्येक नागरिकाला देशाच्या उभारणीत आपलाही वाटा असल्याचा विश्वास दिला. उन्नावमध्ये मी बलात्कार पीडितेच्या घरी गेले. तिला जाळून मारण्यात आले. पीडितेने एकटीने लढा दिला. आपल्या संविधानाने ही लढण्याची क्षमता आणि हे धैर्य त्या पीडित आणि करोडो महिलांना दिले. मी हातरसला गेले तिथे अरुण वाल्मिकी हा पोलीस ठाण्यात सफाई कामगार म्हणून काम करायचा, चोरीच्या आरोपावरून त्याला मारहाण झाली आणि त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की आम्हाला न्याय हवा आहे आणि आमच्या राज्यघटनेने त्यांना हा अधिकार दिला आहे," असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.

"आपले संविधान हे एक संरक्षक कवच आहे, जे देशवासीयांना सुरक्षित ठेवते. न्याय, एकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही ढाल आहे. सत्ताधारी पक्षातील मित्रांनी गेल्या १० वर्षांत हे संरक्षण कवच तोडण्याचा प्रयत्न केला. राज्यघटनेत सामाजिक आणि आर्थिक न्यायाचे वचन आहे, ते मोडण्याचे काम सुरू झाले आहे. हे सरकार लॅटरल एन्ट्रीच्या माध्यमातून राज्यघटना कमकुवत करण्याचे काम करत आहे. लोकसभेचे निकाल असे आले नसते तर राज्यघटना बदलण्याचे काम सुरू झाले असते," असंही प्रियांका गांधींनी म्हटलं.

"आज आमचे मित्र भूतकाळाबद्दल अधिक बोलतात. भूतकाळात काय घडले? नेहरूजींनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला. देशाला सांगा तुम्ही काय करत आहात? तुमची जबाबदारी काय? संपूर्ण जबाबदारी जवाहरलाल नेहरूंची आहे का? हे सरकार आर्थिक न्यायाचे संरक्षण कवच तोडत आहे. बड्या उद्योगपतींसाठीही कृषीविषयक कायदे केले जात आहेत. देशातील शेतकरी वायनाडपासून ललितपूरपर्यंत रडत आहेत. या देशातील शेतकऱ्यांचा देवावर विश्वास आहे. हिमाचलमध्ये सफरचंद पिकवणारे छोटे शेतकरी रडत आहेत कारण एका व्यक्तीसाठी सर्व काही बदलत आहे," अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.

Web Title: Parliament Winter Session constitution debate Priyanka Gandhi also attacked Modi government for over Pandit Nehru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.