नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ५ वाजता बोलणार होते. मात्र, विरोधकांच्या प्रचंड गदारोळामुळे कामकाज तहकूब झाले आणि पंतप्रधानांचे संबोधन टळले. या घटनेनंतर भाजपने विरोधकांवर "पंतप्रधानांवर हल्ल्याचा प्रयत्न" केल्याचा अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे.
दुपारी २ वाजता जेव्हा कामकाज सुरू झाले, तेव्हापासूनच विरोधक विविध मुद्द्यांवरून आक्रमक झाले होते. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी गांधी कुटुंबावर केलेल्या टीकेनंतर वातावरण अधिकच तापले. ५ वाजता जेव्हा पंतप्रधान उत्तरासाठी उभे राहणार होते, तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी सुरू केली. सभापतींनी वारंवार शांत राहण्याचे आवाहन करूनही गदारोळ न थांबल्याने कामकाज तहकूब करावे लागले.
भाजपचे गंभीर आरोपभाजप खासदार मनोज तिवारी यांनी सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना गंभीर दावा केला. ते म्हणाले, "जेव्हा कामकाज स्थगित झाले, तेव्हा विरोधकांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. विरोधी पक्षाचे खासदार पंतप्रधान जिथे बसतात, तिथपर्यंत चढून आले होते. विशेषतः महिला खासदारांनी पंतप्रधानांच्या खुर्चीचा घेराव केला होता. त्यांचा हावभाव पाहता, त्यांची पंतप्रधानांवर हल्ला करण्याची इच्छा असावी, असे वाटत होते." ज्येष्ठ मंत्र्यांनी विनंती करूनही महिला खासदार मागे हटण्यास तयार नव्हत्या, असेही तिवारी यांनी नमूद केले.
नेमकं काय घडलं? कार्यवाही स्थगित झाल्यानंतर विरोधी पक्षाचे खासदार बॅनर आणि पोस्टर्स घेऊन 'वेल'मध्ये उतरले. काही खासदार ट्रेजरी बेंचच्या (सत्ताधारी बाकांकडे) दिशेने धावले. यावेळी अनुराग ठाकूर, अश्विनी वैष्णव आणि किरण रिजिजू हे विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसले.
काँग्रेसचे प्रत्युत्तरभाजपच्या या आरोपांना काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड़ यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, "पंतप्रधान तेव्हा सभागृहात नव्हतेच. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महिलांविषयी काही आक्षेपार्ह विधाने केली होती. आम्ही (ज्योतिमणी, गनीबेन ठाकूर आणि मी) केवळ त्यांना विचारण्यासाठी त्यांच्या बाकांकडे गेलो होतो. आम्हाला येताना पाहून निशिकांत दुबे तिथून पळू लागले, म्हणून आम्ही 'पळतोय, पळतोय' असं म्हणालो. तिथे कोणतीही मारहाण किंवा हल्ल्याचा प्रयत्न झाला नाही."
राहुल गांधींचा टोला: दुसरीकडे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पंतप्रधानांवर टीका केली. "पंतप्रधान मोदी संसदेत येणार नाहीत कारण ते घाबरले आहेत आणि त्यांना सत्याचा सामना करायचा नाहीये," असे त्यांनी म्हटले आहे.
Web Summary : Parliament saw chaos as opposition MPs protested, delaying PM Modi's address. BJP alleges a 'PM attack attempt' after MPs neared his seat. Congress denies attack, citing protest against BJP MP's remarks. Rahul Gandhi criticized Modi for avoiding Parliament.
Web Summary : विपक्षी सांसदों के विरोध के कारण संसद में हंगामा हुआ, जिससे पीएम मोदी का भाषण स्थगित हो गया। बीजेपी ने 'पीएम पर हमले का प्रयास' का आरोप लगाया। कांग्रेस ने हमले से इनकार करते हुए बीजेपी सांसद की टिप्पणी का विरोध बताया। राहुल गांधी ने मोदी पर संसद से बचने का आरोप लगाया।