संसदेचे विशेष अधिवेशन गाजणार; भाजपनंतर काँग्रेसनेही सर्व खासदारांना जारी केला व्हिप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 16:49 IST2023-09-14T16:48:56+5:302023-09-14T16:49:53+5:30
Parliament Special Session: संसदेच्या विशेष अधिवेशनावरुन राजकारण तापले आहे.

संसदेचे विशेष अधिवेशन गाजणार; भाजपनंतर काँग्रेसनेही सर्व खासदारांना जारी केला व्हिप
नवी दिल्ली: केंद्र सरकारने येत्या 18-22 सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनावरुन राजकारण शिगेला पोहोचले आहे. केंद्र सरकारने या अधिवेशनाच्या अजेंड्याबाबत सर्व काही स्पष्ट केले आहे. यानंतर भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही आपल्या खासदारांना व्हिप जारी केला आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, काँग्रेसने आपल्या सर्व खासदारांना व्हिप जारी केला आहे. पक्षाने सर्व खासदारांना 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत संसदेच्या विशेष अधिवेशनात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
सरकारने अजेंडा स्पष्ट केला
केंद्र सरकारने या विशेष अधिवेशनाचा अजेंडा स्पष्ट केला आहे. सरकारने सांगितले की, या अधिवेशनात सरकार संसदेच्या 75 वर्षातील कामगिरी, अनुभव, आठवणींवर चर्चा करेल. याशिवाय सरकार चार आमदारांचाही या अधिवेशनात उल्लेख करणार आहे.
या विधेयकांवर चर्चा होणार
सरकार ज्या विधेयकांचा उल्लेख करेल त्यात अधिवक्ता (सुधारणा) विधेयक, 2023 आणि प्रेस आणि बुक नोंदणी विधेयक, 2023 यांचा समावेश आहे. हे राज्यसभेने मंजूर केले आहेत आणि लोकसभेत प्रलंबित आहेत. तसेच, पोस्ट ऑफिस बिल 2023 आणि मुख्य निवडणूक आयुक्त, इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, सेवा शर्ती विधेयक 2023 देखील आहे.