'ट्रम्प यांनी २४ वेळा...', ऑपरेशन सिंदूरबाबत खरगेंच्या विधानावर जेपी नड्डा संतापले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:12 IST2025-07-21T13:10:53+5:302025-07-21T13:12:05+5:30

Parliament Session: मल्लिकार्जुन खरगे यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीवाल्या विधानावरही तीव्र नाराजी व्यक्त केली.

Parliament Session: 'Such action has not been taken after independence...', JP Nadda's reply to Kharge on Operation Sindoor | 'ट्रम्प यांनी २४ वेळा...', ऑपरेशन सिंदूरबाबत खरगेंच्या विधानावर जेपी नड्डा संतापले, म्हणाले...

'ट्रम्प यांनी २४ वेळा...', ऑपरेशन सिंदूरबाबत खरगेंच्या विधानावर जेपी नड्डा संतापले, म्हणाले...

Parliament Session: आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरुनसंसदेत विरोधकांनी गोंधळ घातला, त्यामुळे सभागृहांचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, जेव्हा देशावर दहशतवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा संपूर्ण विरोधी पक्ष सरकारच्या पाठीशी उभा होता. आपल्या लोकांना मारुन पळून गेलेले दहशतवादी अजूनही फरार आहेत. 

मल्लिकार्जुन खरगे नेमकं काय म्हणाले?
राज्यसभेत आपला मुद्दा मांडताना मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले होते की, जेव्हा देशावर दहशतवादी हल्ले झाले, तेव्हा संपूर्ण विरोधी पक्ष सरकारसोबत एकजूट राहिला. त्यावेळी काँग्रेसने कोणत्याही अटीशिवाय सरकारला पाठिंबा दिला होता, जेणेकरून देश दहशतवादाविरुद्ध एकजूट होऊन उभा राहू शकेल. मात्र, आपल्या लोकांना मारणारे दहशतवादी अजूनही फरार आहेत. आतापर्यंत त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही? 

आपल्या भाषणात खरगेंनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या त्या विधानावरही तीव्र नाराजी व्यक्त केली, ज्यात ट्रम्प यांनी २४ वेळा म्हटले की, त्यांनीच भारत-पाकिस्तान युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी केली. हा आपल्या देशाचा अपमान असल्याची प्रतिक्रिया खरगेंनी दिली होती.

भाजपचे प्रत्युत्तर
मल्लिकार्जुन खरगेंच्या प्रतिक्रियेनंतर भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा म्हणाले की, "स्वातंत्र्यानंतर अशी कारवाई कधीच झालेली नाही.'' तसेच, खरगेंनी ऑपरेशन सिंदूरच्या तपशीलांवर चर्चा सुरू केल्याने नड्डांनी आक्षेपही नोंदवला. विरोधी पक्षनेत्याने नियम २६७ अंतर्गत चर्चा सुरू केली नाही. ती नियम १६७ अंतर्गत झाली पाहिजे. सरकारला ऑपरेशन सिंदूरवर चर्चा नको आहे, असा चुकीचा संदेश जाऊ नये. आम्हालाही यावर सखोल चर्चा हवी आहे, मात्र ती नियमांना धरुन असेल, असे नड्डांनी स्पष्ट केले.

ऑपरेशन सिंदूरबद्दल राजनाथ सिंह काय म्हणाले?

यादरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी परिस्थिती हाताळताना सरकारच्या वतीने मोठे विधान केले. त्यांनी विरोधकांना स्पष्ट संदेश दिला आणि सांगितले की, सरकार लोकशाही परंपरा आणि संवादाच्या भावनेला पूर्णपणे वचनबद्ध आहे. आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. विषय कोणताही असो, तुम्हाला जितका वेळ चर्चा करायची आहे, ते आम्हाला सांगा, आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. सरकार कोणताही मुद्दा पुढे ढकलू इच्छित नाही. जर विरोधकांना सकारात्मक भावनेने चर्चा करायची असेल, तर सरकार प्रत्येक विषयावर पूर्ण संयम आणि गांभीर्याने चर्चा करण्यास तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Parliament Session: 'Such action has not been taken after independence...', JP Nadda's reply to Kharge on Operation Sindoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.