संसद धक्काबुक्की प्रकरण: सात सदस्यांची SIT स्थापन, कोणते अधिकारी करणार तपास?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 16:45 IST2024-12-21T16:44:24+5:302024-12-21T16:45:06+5:30
Parliament Scuffle: संसद परिसरात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी काँग्रेस आणि भाजपने एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता एसआयटी नेमण्यात आली आहे.

संसद धक्काबुक्की प्रकरण: सात सदस्यांची SIT स्थापन, कोणते अधिकारी करणार तपास?
संसद परिसरात धक्काबुक्कीचा प्रकार घडला. भाजपच्या खासदारांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर धक्का दिल्याचा आरोप केला. तर काँग्रेसकडून भाजपच्या खासदारांनी रस्ता अडवला आणि मल्लिकार्जून खरगे यांना धक्का दिल्याचा आरोप केला. दोन्हीकडून एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. गुन्हा दाखल करत दिल्ली पोलिसांनी याची चौकशी सुरू केली आहे.
हे प्रकरण संसद रोड पोलीस ठाण्यातून दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेच्या चाणक्यपुरीतील ISC यूनिट करणार आहे.
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने एसआयटी अर्थात विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या एसआयटीमध्ये सात सदस्यांचा समावेश आहे.
एसआयटीमध्ये कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश?
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शुक्रवारी रात्री एसआयटी स्थापन करण्यात आली. या एसआयटीमध्ये दोन सहायक पोलीस आयुक्त, दोन पोलीस निरीक्षक आणि तीन उप पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.
संसद धक्काबुक्की प्रकरणाचा तपास करून ही एसआयटी पोलीस आयुक्तांकडे रिपोर्ट सादर करणार आहे.
नवी दिल्ली जिल्ह्यातील संसद रोड पोलीस ठाण्याकडून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी संबंधिक प्रकरणाचा FIR, तपासाची माहिती अद्याप गुन्हे शाखेला देण्यात आलेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. संसद सचिवालयाला सीसीटीव्ही फुटेजसाठी पत्र पाठवले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.