लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चा सुरू आहे. विरोधकांनी सरकावर टीका केली. या टीकेला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले. पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांना मारणारे तीन दहशतवादी काल 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत मारले गेले. यावर शाह म्हणाले, यासाठी सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई केली होती आणि अनेक पातळ्यांवर दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे.
"दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी एका महिन्याहून अधिक काळ शोध मोहीम राबवण्यात आली आणि त्यानंतर २२ जुलै रोजी सेन्सर्सद्वारे दहशतवाद्यांची माहिती मिळाली. सोमवारी केलेल्या कारवाईत सुलेमान, अफजान आणि जिब्रान हे तीन दहशतवादी मारले गेले आहेत. चकमकीनंतर, दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या रायफलमधील काडतुसे आणि त्यांना मदत करणाऱ्यांच्या एफएसएल अहवालातून दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आल्याची माहिती शाह यांनी दिली.
अमित शाह म्हणाले, पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते आणि पहलगाममध्ये दहशतवादी पाठवणाऱ्यांच्या मालकांना मारले होते आणि आता लष्कराने ऑपरेशन महादेव अंतर्गत त्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यावेळी सभागृहात यावर सपाचे खासदार अखिलेश यादव यांनी गृहमंत्र्यांचे भाषण थांबवून म्हणाले की, मालक पाकिस्तान आहे, यावर अमित शहा यांनी उत्तर दिले की, तुम्ही पाकिस्तानशी बोलता का?
'दहशतवाद्यांचा धर्म पाहून दुःखी होऊ नका'
यानंतर लोकसभेत गोंधळ सुरू झाला आणि सर्व सपा खासदार आपापल्या जागांवरून उभे राहिले. पण सभापती ओम बिर्ला यांनी व्यत्यय संपवून अमित शहा यांना त्यांचे भाषण पूर्ण करण्यास सांगितले. यानंतर अमित शहा पुढे म्हणाले की, दहशतवाद्यांच्या खात्माची माहिती मिळताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सर्व खासदारांमध्ये आनंदाची लाट येईल अशी मला आशा होती. पण विरोधी पक्षाच्या खासदारांचे चेहऱ्यावर नाराी होती. दहशतवाद्यांच्या खात्मानंतरही ते आनंदी नाहीत.
यानंतर, पुन्हा एकदा अखिलेश यादव यांनी अमित शहांना त्यांच्या भाषणात मध्येच अडवले, त्यानंतर गृहमंत्र्यांनी सांगितले की, अखिलेश जी, तुम्ही दहशतवाद्यांचा धर्म पाहून दुःखी होऊ नका. अमित शाह म्हणाले की, सहा शास्त्रज्ञांनी या अहवालाची पुष्टी केली आहे आणि मला सांगितले आहे की, १०० टक्के पहलगाममध्ये चालवण्यात आलेल्या गोळ्या त्याच आहेत.