"महाराष्ट्राचा निकाल ऐतिहासिक"; PM मोदींच्या विधानानंतर विरोधी बाकांवरुन ७० लाख मतदारांचा उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 19:03 IST2025-02-04T18:57:50+5:302025-02-04T19:03:50+5:30

संसदेतल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा उल्लेख केला.

Parliament Budget Session Prime Minister Narendra Modi mentioned the results of the Maharashtra assembly elections | "महाराष्ट्राचा निकाल ऐतिहासिक"; PM मोदींच्या विधानानंतर विरोधी बाकांवरुन ७० लाख मतदारांचा उल्लेख

"महाराष्ट्राचा निकाल ऐतिहासिक"; PM मोदींच्या विधानानंतर विरोधी बाकांवरुन ७० लाख मतदारांचा उल्लेख

Parliament Budget Session: लोकसभेतल्या पराभावानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवलं. महायुतीने विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. विधानसभा निवडणुकीत महायुतीने सर्व विक्रम मोडले. महायुतीने २८८ पैकी २३५ जागांवर दमदार विजय मिळवला. महायुतीतल्या एकट्या भाजपने तब्बल १३२ जागांवर विजय मिळवला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील ऐतिहासिक निकालाचा उल्लेख केला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच जनतेच्या आशीर्वादाने इतक्या जागा मिळाल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकींचा उल्लेखही केला. महाराष्ट्रात महायुतीने मिळवलेल्या बहुमताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलं. आम्ही कसं काम करतो हे आत्ताच हरियाणामध्ये देशाने पाहिले. तसेच महाराष्ट्रातही ऐतिहासिक निकाल लागला, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

"आम्ही कसं काम करतो हे आत्ताच हरियाणामध्ये देशाने पाहिले आहे. कोणत्याही खर्चाशिवाय आणि कोणतीही स्लिप न देता नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. सरकार स्थापन होताच तरुणांना नोकऱ्या मिळाल्या. हरियाणात तिसऱ्यांदा इतका मोठा विजय मिळणे हा त्याचा परिणाम आहे असं आम्ही म्हणतो . हरियाणात इतिहासात तिसऱ्यांदा विजय मिळणे ही ऐतिहासिक घटना आहे. महाराष्ट्रातही ऐतिहासिक निकाल लागला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच जनतेच्या आशीर्वादाने सत्ताधाऱ्यांना इतक्या जागा मिळाल्या आहेत," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

दुसरीकडे, पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निकालांचा उल्लेख करताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पंतप्रधान मोदी महाराष्ट्र विधानसभा निकालाबाबत बोलत असताना विरोधी बाकांवरील खासदारांनी ७० लाख मतदार असा उल्लेख केला. बराच वेळ विरोधी बाकावरील खासदार ७० लाख मतदारांचा उल्लेख करत होते.

दरम्यान, आदल्याच दिवशी विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्रात पाच महिन्यात वाढलेल्या ७० लाख नवीन मतदारांचा उल्लेख केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात केवळ ५ महिन्यांत ७० लाख मतदार वाढले जे जवळपास हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके होते असा दावा राहुल गांधी यांनी केला होता.

Web Title: Parliament Budget Session Prime Minister Narendra Modi mentioned the results of the Maharashtra assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.