आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:59 IST2025-12-17T17:58:38+5:302025-12-17T17:59:33+5:30
Crime News: उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे मुलानेच जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या नराधम मुलाने आधी लोखंडी वरवंट्याने आईच्या डोक्यावर प्रहार करून तिचा जीव घेतला.

आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य
उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे मुलानेच जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या नराधम मुलाने आधी लोखंडी वरवंट्याने आईच्या डोक्यावर प्रहार करून तिचा जीव घेतला. त्याचदरम्यान, वडिलांनी याबाबत फोन करून कुणालातरी सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोक्यावरही वरवंट्याने प्रहार केला. त्यानंतर दोरीने गळा आवळून त्यांची हत्या केली. आई वडिलांना ठार मारल्यानंतर या तरुणाने त्यांच्या मृतदेहांचे तुकडे करून ते गोणीत भरून नदित फेकून दिले.
अंबेश असं या आई-वडिलांचे प्राण घेणाऱ्या नराधम मुलाचं नाव असून, श्याम बहादूर (६५) आणि बबिता (६३) अशी दुदैवी वडील आणि आईची नावं आहेत. कौटुंबिक आणि पैशांच्या वादातून मुलाने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, नदीत फेकलेले मृतहेश शोधण्यासाठी व्यापक प्रमाणावर शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मृत श्याम बहादूर हे त्यांची पत्नी बबिता हिच्यासोबत अहमदपूर गावात राहायचे. त्यांना ३ मुली आणि अंबेश नावाचा एक मुलगा होता. अंबेश हा पत्नी आणि दोन मुलांसह कोलकाता येथे राहत होता. तीन महिन्यांपासून तो एकटाच घरी आलेला होता. तसेच घटना घडली तेव्हा घरात आई-वडील आणि मुलगा असे तिघेजणच होते.
मिळालेल्या माहितीनुसार अंबेश आणि त्याच्या आई-वडिलांमध्ये पैसे आणि जमिनीवरून वाद नेहमी वाद व्हायचा. दरम्यान, त्यांची मुलगी वंदना हिने एके दिवशी फोन लावता असता वडिलांचा फोन लागला नाही. तसेच भावाचाही फोन लागत नसल्याने तिने तिघेही बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासादरम्यान, १५ डिसेंबर रोजी पोलिसांनी अंबेश याला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो आपला जबाब सातत्याने बदलत होता. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी अधिक सक्तीने चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
अंबेश याच्या कबुलीजबाबामधून धक्कादायक माहिती समोर आली. त्याने सांगितलं की, मी कोरोना काळात एका मुस्लिम मुलीसोबत कोलकाता येथे लग्न केलं होतं. मला दोन मुलंही झाली. मात्र या लग्नावरून कुटुंबीय नाराज झाले होते. परधर्मातील मुलीसोबत केलेल्या लग्नावरून घरात रोज भांडणं व्हायची. मी पत्नीला सोडचिठ्ठी द्यावी, अशी कुटुंबीयांची मागणी होती’’. अशी माहिती अंबेश याने दिली. दरम्यान, पत्नी पोटगीसाठी पैसे मागत असल्याने अंबेश याने घरात पैशांची मागणी केली. मात्र आई-वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावरून वाद वाढला आणि अंबेश याने आई-वडिलांच्या डोक्यात वरवंटा घालून त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेहांचे तुकडे करून ते गोणीत भरले आणि गोण्यांमध्ये भरलेले मृतदेह पुलावरून नदीत फेकले. त्यातील एक तुकडा गोणीत भरलेला नव्हता. तो त्याने वाराणसीला जाताना सई नदीत फेकला. त्यानंतर तो काही काळ वाराणसीमध्ये फिरला. मात्र अखेरीच तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.