"हे पाप स्वतः गंगा माता धुवू शकत नाही"; महाकुंभवरुन पल्लवी पटेल यांचा योगींवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 10:58 IST2025-02-19T10:58:11+5:302025-02-19T10:58:48+5:30
Pallavi Patel And Yogi Adityanath on Mahakumbh : सिराथू मतदारसंघाच्या आमदार पल्लवी पटेल यांनी महाकुंभवरून राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

"हे पाप स्वतः गंगा माता धुवू शकत नाही"; महाकुंभवरुन पल्लवी पटेल यांचा योगींवर हल्लाबोल
अपना दल (कमेरवादी) च्या नेत्या आणि सिराथू मतदारसंघाच्या आमदार पल्लवी पटेल यांनी महाकुंभवरून राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाकुंभात व्यवस्थापनाच्या नावाखाली सरकारने मानवी भावनांचा खेळ केला आहे आणि गंगा माता देखील हे पाप धुवू शकणार नाही असं म्हटलं आहे.
पल्लवी पटेल म्हणाल्या, "आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे त्यापेक्षा चांगला काळ असू शकत नाही. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राजकीय राज्य आहे. येथे महाकुंभाचं आयोजन केलं जात आहे. अशा परिस्थितीत महाकुंभाच्या वेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आशीर्वादाने होते."
"देश-विदेशातून लाखो भाविक महाकुंभमेळ्याला येत आहेत. त्यांच्या वतीने मी सरकारला एक प्रश्न विचारते. सरकारने आपल्या शाही दुर्बिणीद्वारे महाकुंभमेळ्याला येणाऱ्या ४० ते ४५ कोटी भाविकांचे आकडे सादर केले, परंतु चेंगराचेंगरीत ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावलं त्यांची आकडेवारी का जाहीर केली नाही?"
"सरकार मोठ्या गोष्टी करण्यात खूप हुशार आहे, परंतु जेव्हा योग्य व्यवस्थापन आणि मानवी भावनांचा विचार केला जातो तेव्हा ते शून्य असतं. ते हे वारंवार सिद्ध करत आहेत. सरकार आणि ते चालवणारे लोक व्यवस्थापनाच्या नावाखाली मानवी भावभावनांशी खेळले आहेत आणि हे पाप स्वतः गंगा माता देखील धुवू शकत नाही" असं पल्लवी पटेल यांनी म्हटलं आहे.