पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 09:44 IST2025-05-17T09:40:41+5:302025-05-17T09:44:25+5:30
भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा व्यापार बंद केला आहे.

पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला होता. यामुळे भारत सरकारने पाकिस्तानातून थेट किंवा कोणत्याही तिसऱ्या देशातून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयात आणि ट्रान्सशिपमेंटवर तात्काळ बंदी घातली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक आर्थिक आणि राजनैतिक पावले उचलली आहेत, यात व्यापार बंदीचा समावेश आहे.
आता पाकिस्तान युक्ती वापरून एखाद्या देशामार्फत भारतात माल पाठवण्याचा प्रयत्न करू शकतो, असं दिसत आहे. यामुळे आता भारत सरकारने पाकिस्तानशी संबंधित वस्तूंवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या महसूल गुप्तचर संचालनालयाने पाकिस्तानमधून येणार्या आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या तिसऱ्या देशांमधून भारतात पोहोचणाऱ्या वस्तूंवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
२ मे रोजी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयात आणि वाहतुकीवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली. यानंतर सीमाशुल्क विभागाने कडक देखरेख सुरू केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, अधिसूचना जारी होण्यापूर्वी समुद्री वाहतुकीत असलेले कंटेनर देखील आता बंदीच्या कक्षेत येतात, तर सामान्यतः अशा प्रकरणांमध्ये सूट दिली जाते.
संशय आल्यानंतर बंदरात माल थांबवला जातो
मिळालेल्या माहितीनुसार, जिथे जिथे संशय आहे तिथे सीमाशुल्क विभाग कारवाई करत आहे. डीआरआयने काही बंदरांवर कारवाई केली आहे. काही दिवसापूर्वीच पाकिस्तानी ध्वज असलेल्या जहाजाला भारतात डॉक करण्याची परवानगी देण्यात आली नाही. व्यापाऱ्यांनी नुकसान झाल्याची तक्रार केली आहे, परंतु सुरक्षा आणि नियमांसाठी ही कठोर कारवाई आवश्यक होती, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
पाकिस्तानातून युएई सारख्या तिसऱ्या देशांमधून येणाऱ्या वस्तू ओळखणे सोपे नाही कारण या वस्तू 'रूल ऑफ ओरिजिन सर्टिफिकेट' सोबत येतात. पण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की लेबल्स आणि पॅकेजिंगची बारकाईने तपासणी केल्यास खरा स्रोत उघड होतो. पाकिस्तानी खजूर आणि सुकामेवा यूएईमार्गे भारतात येत असल्याचा संशय आहे आणि हा मुद्दा अमिराती सरकारसमोर उपस्थित करण्यात आला आहे. यूएईने उत्पादनाचे आकडे दिले आहेत. ते स्वतः खजूर आणि सुकामेवा देखील तयार करतात, असा दावा त्यांनी केला.
२ मे च्या अधिसूचनेपूर्वीच, भारताने २४ एप्रिल रोजी अटारी येथील चेक पोस्ट बंद केले होते. यामुळे पाकिस्तानशी थेट व्यापार पूर्णपणे थांबला. GTRI नुसार, सुमारे १० अब्ज डॉलर्स किमतीचा भारतीय माल ट्रान्झिट हब मार्गांनी पाकिस्तानमध्ये पोहोचतो.