Pakistan's claim that India's claim of destroying terrorist bases is false | दहशतवादी तळ उद्धवस्त केल्याचा भारताचा दावा खोटा असल्याचा पाकिस्तानचा कांगावा

दहशतवादी तळ उद्धवस्त केल्याचा भारताचा दावा खोटा असल्याचा पाकिस्तानचा कांगावा

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमधील तीन दहशतवादी तळ उद्धवस्त केल्याचा भारताचा दावा खोटा असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला आहे. जिथे मारा केला त्या जागी भारताने कोणाही विदेशी राजदूत किंवा पत्रकारांना घेऊन जावे व आपला दावा खरा असल्याचे सिद्ध करून दाखवावे, असे आव्हानही पाकिस्तानने दिले आहे.

पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील तंगधर व केरान क्षेत्रामध्ये केलेल्या माऱ्याला भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानचे सहा ते दहा सैनिक मारले गेले व तीन दहशतवादी तळ उद््ध्वस्त करण्यात आले, असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी रविवारी सांगितले होते. या माºयात पाकिस्तानच्या आणखी एका दहशतवादी तळाचे मोठे नुकसान झाले असून, सीमेपलीकडून होणाºया दहशतवादी कारवायांना त्यामुळे मोठा तडाखा बसला आहे, असेही ते म्हणाले होते. रावत यांनी केलेला दावा खोटा असल्याचे पाकिस्तानच्या लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असीफ गफूर यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, अत्यंत जबाबदारीच्या पदावर काम करणाºया रावत यांच्यासारख्या व्यक्तीने असे दावे करणे चुकीचे आहे. भारतीय लष्कराने मारा केला तिथे एकही दहशतवादी तळ नव्हता. भारताच्या पाकिस्तानातील राजदूतावासाने कोणाही विदेशी राजदूताला किंवा पत्रकारांना घेऊन त्या जागेवर जावे आणि खातरजमा करून घ्यावी.

भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने खोटे दावे करण्यात येत असून हे प्रकार विशेषत: पुलवामा हल्ल्यानंतर अधिक वाढले आहेत. त्यामुळे प्रादेशिक शांततेला धोका निर्माण झाला आहे. देशांतर्गत काही कुहेतूंची पूर्तता करण्यासाठी भारतीय लष्कर सातत्याने खोटे दावे करीत आहेत. हे वर्तन लष्करी मूल्यांचा भंग करणारे आहे, असेही गफूर यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

घुसखोरीच्या प्रयत्नांना अटकाव

काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारताने ५ आॅगस्ट रोजी रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या अंगाचा तिळपापड झाला आहे. काश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानने कांगावा केला; पण त्या देशाला कोणीही फारसे गांभीर्याने घेतले नाही.
त्यानंतर पाकिस्तानने भारतातील कुरापती आणखी वाढविल्या आहेत. दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय करून तेथून दहशतवादी भारतात घुसविण्याचे जोरदार प्रयत्न पाकिस्तानकडून होत आहेत. त्याला भारताने रविवारी कारवाईद्वारे अटकाव केल्याने पाकिस्तान संतप्त झाला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pakistan's claim that India's claim of destroying terrorist bases is false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.