पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद, विचारविनिमयानंतरच निर्णय; पहलगाम हल्ल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूकमंत्री नायडू यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 08:55 IST2025-04-29T08:53:10+5:302025-04-29T08:55:17+5:30
पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यात २६ जण ठार झाल्यानंतर भारत व पाकमध्ये तणाव वाढत असतानाच पाकने मागील आठवड्यात भारतीय एअरलाईन्सना आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे.

पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद, विचारविनिमयानंतरच निर्णय; पहलगाम हल्ल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूकमंत्री नायडू यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताला हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर उत्पन्न झालेल्या स्थितीचे आकलन करण्यात येत असून, संपूर्ण विचारविनिमयानंतरच कोणताही निर्णय घेतला जाणार आहे, असे नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी म्हटले आहे. यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यात २६ जण ठार झाल्यानंतर भारत व पाकमध्ये तणाव वाढत असतानाच पाकने मागील आठवड्यात भारतीय एअरलाईन्सना आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. या पार्श्वभूमीवर विमान वाहतूक मंत्रालय एअरलाईन्सशी संबंधित मुद्द्यांचे मूल्यांकन करीत आहे. यात उच्च परिचालन खर्चामुळे विमानाच्या तिकिटामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पहलगाम हल्ल्यामुळे भारत-पाक संबंध अधिकच चिघळू लागले आहेत.
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
एअरलाइनचा खर्च वाढतोय
मंत्री म्हणाले की, आम्ही स्थितीचे आकलन करीत आहोत व विमान कंपन्यांबरोबर चर्चा सुरू आहे. प्रदीर्घ काळापर्यंत हवाई क्षेत्र बंद राहण्याची शक्यता व त्याच्या परिणामावर काम करण्यात येत आहे.
पाकचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणे, विशेषत: उत्तर भारतीय शहरांतून उड्डाण घेणाऱ्या विमानांचा प्रवासाचा वेळ अनेक तासांनी वाढत आहे. यामुळे एअरलाईनचा परिचालन खर्च वाढत आहे.
तिकिटांबाबत विचार सुरू
कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थिती पूर्णपणे समजून घ्यावी लागणार आहे, असे ते म्हणाले. हवाई क्षेत्रावर बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तिकिटासंदर्भात कोणते दिशानिर्देश जारी करण्याची योजना आहे का, असे विचारले असता नायडू म्हणाले की, सर्व पैलूंवर विचार करण्यात येणार आहे.
सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, हवाई क्षेत्र बंद झाल्यानंतर उद्भवलेल्या स्थितीवर विचार केला जाईल. विमानांचे तिकीट मोठ्या प्रमाणावर प्रभावित होत आहेत, असे दिसले तर मंत्रालय या मुद्द्यात जरूर लक्ष घालणार आहे. सध्या सर्व मुद्द्यांवर विचार सुरू आहे. परंतु, सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे.
विमान वाहतुकीचे विश्लेषण करणारी संस्था सिरियमच्या आकडेवारीनुसार, भारतीय एअरलाईन्सकडून विविध आंतरराष्ट्रीय ठिकाणांसाठी ६,००० पेक्षा जास्त विमाने सोडली जातात.