पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे खवळलेल्या पाकिस्तानी सैन्याने बुधवारी नियंत्रण रेषेनजीकच्या भागात मोठ्या प्रमाणात गोळीबार केली होता. या गोळीबारात १० हून अधिक भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय मोठ्या प्रमाणात मालमत्तेचंही नुकसान झालं आहे. पाकिस्तानने केलेल्या या आगळिकीनंतर आता भारतीय लष्करानेही पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर देण्याच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. तसेच नियंत्रण रेषेजवळ सामान्य नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला योग्य ते प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारताने केलेल्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानी सैन्याने जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. यात काही सामन्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, नियंत्रण रेषेवरील घडामोडींवर भारतीय सैन्य बारीक नजर ठेवून आहे. भारताचे लष्कर प्रमुख स्थानिक अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. तसेच नियंत्रण रेषेवर तोफांचा मारा करणाऱ्या पाकिस्तानला योग्य ते प्रत्युत्तर देण्याचे आदेश लष्कराला देण्यात आले आहेत.
दरम्यान,भारताने दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानी सैन्याने भारतातील नागरी भागांना लक्ष्य करून तोफांचा मारा केला होता. या हल्ल्यात नियंत्रण रेषेनजीर राहणारे अनेक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. त्यानंतर नियंत्रण रेषेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.