पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 08:58 IST2025-04-27T08:57:23+5:302025-04-27T08:58:41+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पाकिस्तानची केवळ धोरणात्मक कोंडी करून थांबणार नाही तर बालाकोटसारखा भीषण हल्ला करेल, याची पाकिस्तान सरकार आणि दहशतवाद्यांना भीती आहे. यातही अतिरेक्यांना अदृश्य हल्ल्याची भीती आहे.

पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
चंद्रशेखर बर्वे लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पृथ्वीच्या शेवटच्या टोकापर्यंत पाठलाग करून हिशेब चुकविण्याची घोषणा केल्यामुळे पाकिस्तानात दडून बसलेल्या दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेतला असला तरी जिवाच्या भीतीपोटी अस्वस्थ आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार पाकिस्तानची केवळ धोरणात्मक कोंडी करून थांबणार नाही तर बालाकोटसारखा भीषण हल्ला करेल, याची पाकिस्तान सरकार आणि दहशतवाद्यांना भीती आहे. यातही अतिरेक्यांना अदृश्य हल्ल्याची भीती आहे. याचे कारण असे की, मागील दीड-दोन वर्षात अननोन गनमॅन च्या हातून तब्बल २० ते २५ कुख्यात दहशतवाद्यांची हत्या झाली आहे. ही हत्या कुणी केली ? याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
ज्या दहशतवाद्यांची हत्या झाली आहे त्यात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसह अनेक अतिरेकी संघटनेच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. मुंबईवरील हल्ल्याचा आरोपी आणि कुख्यात दहशतवादी हाफीज सईदचा उजवा हात समजला जाणारा अदनान अहमद मारला गेला आहे. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहरचा निकटवर्तीय मौलाना रहीम उल्ला तारिक कराचीत मारला गेला. झिया उर रहमान उर्फ नदीम ऊर्फ अबू कतल ऊर्फ कतल सिंधी अगदी मागच्याच महिन्यात १५ मार्चला झेलममध्ये मारला गेला आहे.
अज्ञात बंदूकधाऱ्यांच्या हल्ल्याचा दहशतवाद्यांनी मोठा धसका घेतला आहे.लष्कर-ए-तोयबाचा अबू कताल आणि जनातचा नेता मुफ्ती अब्दुल बाकी नूरझाई यांची अलीकडेच अशीच हत्या केली. पाकिस्तान सरकारने या हत्यांसाठी भारतावर आरोप केले आहे.
कारवाईत अनेक अतिरेक्यांना टिपण्यात यश
लष्कर-ए-तोयबाचा ख्वाजा शाहिद याचा शिरच्छेद केलेला मृतदेह पीओकेमधील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) आढळून आला होता. याच संघटनेचा प्रमुख कमांडर अक्रम गाझी आणि मौलाना रहीम उल्लाह तारिक हाही एका हल्ल्यात मरण पावला. कडव्या विचारधारेचा उपदेशक मौलाना शेर बहादूर, सुखदूल सिंग, रियाज अहमद ऊर्फ अबू कासिम, जमात-उद-दावाचे मदरसा नेटवर्क चालविणारा हाफिज सईदचा जवळचा सहकारी हुसेन अरैन मारला गेला आहे. जैश-ए-मोहम्मदचा लतीफ मारला गेला आहे. तो गुलिस्तान-ए-जौहर येथे मौलवी म्हणूनही काम करीत होता. कमांडर बशीर अहमद पीर ऊर्फ इम्तियाज आलम, हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनचा जवळचा आणि अल-बद्र मुजाहिदीनचा माजी कमांडर सय्यद खालिद रझा आणि इस्लामिक स्टेट या जागतिक दहशतवादी गटाचा टॉप कमांडर म्हणून काम करणारा काश्मिरी दहशतवादी ऐजाज अहमद अहंगर याचीही अज्ञान बंदुकधाऱ्यांनी हत्या केली.
पंजाब पोलिसच्या इंटेलिजेंस मुख्यालयावर मे २०२१ मध्ये झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग संधू ऊर्फ हरविंदर सिंग रिंडा याचे लाहोरमधील रुग्णालयात निधन झाले. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येत त्याचा सहभाग असल्याची शंका वर्तविली जात होती. एनआयएने १० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. संधूचे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे निधन झाल्याचे वृत्त लाहोरमधील लष्करी रुग्णालयाने दिले होते. इंडियन एअरलाइन्सचे आयसी-८१४ विमानाचे अपहरण करणाऱ्या पाच दहशतवाद्यांपैकी एक झहूर मिस्त्री कराचीमध्ये ठार झाला.