डॉक्टर, सुशिक्षित तरुणांना पाकिस्तानी 'आका'ने दिली ट्रेनिंग; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचे जैश-ए-मोहम्मदशी थेट कनेक्शन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:28 IST2025-11-24T16:28:03+5:302025-11-24T16:28:58+5:30
'व्हाईट कॉलर' दहशतवादी मॉड्यूलला तयार करण्यासाठी आणि दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यासाठी २०१९ पासून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत होता.

डॉक्टर, सुशिक्षित तरुणांना पाकिस्तानी 'आका'ने दिली ट्रेनिंग; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचे जैश-ए-मोहम्मदशी थेट कनेक्शन!
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासात आता एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. या स्फोटात सहभागी असलेल्या 'व्हाईट कॉलर' दहशतवादी मॉड्यूलला तयार करण्यासाठी आणि दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यासाठी २०१९ पासून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत होता. शिक्षण घेतलेले आणि उच्चभ्रू समजले जाणारे हे तरुण डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून पाकिस्तानसह जगातील अनेक भागांमध्ये बसलेल्या दहशतवादी म्होरक्यांकडून दहशतवादी कारवायांचे धडे गिरवत होते, अशी माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे.
टेलीग्रामच्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये ट्रेनिंग
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, या 'व्हाईट कॉलर' मॉड्यूलमध्ये डॉ. मुजम्मिल, डॉ. आदिल, डॉ. मुजफ्फर, डॉ. उमर अशा सुशिक्षित तरुणांचा समावेश आहे. सुरुवातीला हे लोक ट्विटर, फेसबुक आणि टेलिग्रामसारख्या सार्वजनिक सोशल मीडिया अकाउंट्सच्या माध्यमातून सीमापार असलेल्या दहशतवाद्यांशी जोडले गेले. पण लवकरच, त्यांनी संपर्क साधण्यासाठी टेलिग्रामच्या प्रायव्हेट ग्रुप्सचा वापर सुरू केला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, याच प्रायव्हेट ग्रुप्सच्या माध्यमातून भारतातील या सुशिक्षित दहशतवादी मॉड्यूलला दहशतवाद आणि द्वेष करण्याची खरी ट्रेनिंग देण्यात आली.
IED बनवण्यासाठी युट्यूबचा वापर
या तरुणांनी IED म्हणजेच स्फोटक उपकरणे बनवण्याचे तंत्रज्ञान शिकण्यासाठी युट्यूबचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याचेही चौकशीत उघड झाले आहे. यांच्या डिजिटल फुटप्रिंट्सचा तपास करत असताना, तपास यंत्रणांना उकासा, फैजान आणि हाश्मी या तीन व्यक्तींच्या नावांचे धागेदोरे मिळाले आहेत. विशेष म्हणजे, हे तिघेही भारताबाहेरून आपली दहशतवादी कृत्ये चालवत असून, त्यांचे थेट संबंध पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी जोडले जात आहेत.
भारतात राहून स्फोट घडवण्याचे टार्गेट!
तपासातील इतर अहवालांमधून असे दिसून आले आहे की, अटक करण्यात आलेल्या या डॉक्टरांनी आणि सुशिक्षित तरुणांनी अफगाणिस्तान किंवा सीरियासारख्या ठिकाणी जाऊन दहशतवादी गटांमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, त्यांचे म्होरके असलेल्या दहशतवादी सरगणांनी त्यांना तसे न करण्यास सांगितले. या 'आकांनी' त्यांना भारतामध्येच राहून देशातील विविध ठिकाणी स्फोट घडवण्याचे आणि दहशत पसरवण्याचे टार्गेट दिले होते.
या निर्देशानुसारच या तरुणांनी आपली भयानक योजना प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली. आधी जम्मू-काश्मीरमध्ये काही जणांना पकडण्यात आले, त्यानंतर हरियाणातील फरीदाबादमध्ये २९०० किलो स्फोटके आढळली आणि आता लाल किल्ल्यातील बॉम्बस्फोटाने या 'व्हाईट कॉलर' मॉड्यूलचे भयानक सत्य उघड झाली आहे. दहशतवादाचे हे नवे आणि डिजिटल स्वरूप तपास यंत्रणांसाठी मोठे आव्हान बनले आहे.