नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला असला तरीही पाकच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. भलेही शत्रू राष्ट्र बंदुकीतून गोळीबार करत नसेल परंतु मोबाईलच्या माध्यमातून तो भारतीय नागरिकांना टार्गेट करत आहे. देशाच्या सुरक्षा यंत्रणेने याबाबत मोठा अलर्ट जारी केला आहे. ज्यात सर्वसामान्य नागरिकांसह निवृत्त सैन्य अधिकारी आणि पत्रकारांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मोबाईलवरून जाळ्यात अडकवण्याचा प्लॅन
सुरक्षा यंत्रणेनुसार, भारतातील नागरिक विशेषत: पत्रकार, निवृत्त सैन्य अधिकारी यांना काही संशयास्पद कॉल्स येत आहेत. ज्यात कॉल करणारा स्वत:ला भारतीय सैन्याचा अथवा एखाद्या गुप्तचर संस्थेचा अधिकारी असल्याची बतावणी करतो. हे लोक संबंधितांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून संवेदशनशील माहिती आणि सैन्य ऑपरेशननिगडीत काही प्रश्न विचारतात.
'या' नंबरवरून कॉल आल्यास करा ब्लॉक
जर तुम्हाला फोनवर +91 7340921702 यासारख्या कुठल्या नंबरवरून कॉल आल्यास तुम्हीही सतर्क राहा. हे नंबर दिसताना भारतीय नंबर प्रमाणे आहेत परंतु त्यात स्पूफिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याचा अर्थ खरा नंबर तुम्हाला दिसत नाही आणि त्याऐवजी फेक नंबर स्क्रिनवर झळकतो. कॉल करणारा व्यक्ती ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती मागत असतो. लक्षात कुणीही अधिकारी अशाप्रकारे वैयक्तिक माहिती फोनवर मागत नाही.
सतर्क राहणे सुरक्षित
- कुठल्याही अज्ञात कॉलवर तुम्ही तुमची ओळख आणि खासगी माहिती शेअर करू नका
- कॉल करणाऱ्या व्यक्तीवर सहजपणे विश्वास ठेवू नका, मग ते कितीही तुम्हाला विश्वासात आणण्याचा प्रयत्न करत असेल.
- जर कॉलबाबत थोडीही शंका वाटला तर तातडीने फोन कट करा आणि तो नंबर ब्लॉक करा
- अशाप्रकारे तुम्हाला कॉल येत असतील तर जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन अथवा सायबर क्राइम पोर्टलवर याबाबत तक्रार करा.
WhatsApp आणि ईमेलवरही धोका
केवळ कॉलच नाही तर WhatsApp आणि इतर सोशल मीडियावर संशयित फाईल्स, लिंक अथवा व्हिडिओ पाठवले जातात. त्यातील काही फाईल्स Tasksche.exe नावाने असतात. ज्यात व्हायरस असतो. या लिंकवर क्लिक केल्यास तुमचा फोन किंवा संगणक यातील सर्व डेटा चोरला जाऊ शकतो.
या गोष्टींची काळजी घ्या
- अज्ञात नंबरवरून आलेले कॉल, फाईल्स अथवा लिंक उघडू नका
- .apk अथवा .exe सारख्या फाईल्सपासून दूर राहा
- तुमच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये चांगला एंटीव्हायरसचा वापर करा.
दरम्यान, सीजफायरमुळे सीमेवर शांतता असेल परंतु आता या दोन्ही देशातील संघर्ष डिजिटल वॉरमध्ये लढला जाईल. शत्रू तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भारताची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करत राहील. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहणे आणि कुठल्याही अज्ञात कॉल्स, संशयित मेसेजला हलक्यात घेऊ नये. तुमची सतर्कता ही देशाची खरी सुरक्षा आहे.