घुसखोरीसाठी पाककडून मानवरहित हवाई वाहनांचा वापर; ३६ ठिकाणी ४०० ड्रोनच्या माध्यमातून प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 08:43 IST2025-05-11T08:42:17+5:302025-05-11T08:43:24+5:30
हे सर्व हल्ले भारताने परतून लावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

घुसखोरीसाठी पाककडून मानवरहित हवाई वाहनांचा वापर; ३६ ठिकाणी ४०० ड्रोनच्या माध्यमातून प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सीमेवर सुरू झालेल्या संघर्षात भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी करून विध्वंस घडविण्यासाठी पाकिस्तानकडून कामिकाझे ड्रोनसह सशस्त्र मानवरहित हवाई वाहनांपर्यंत सर्व प्रकारची अस्त्रे वापरण्यात आली. परंतु, हे सर्व हल्ले भारताने परतून लावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भारत-पाकिस्तान युद्धात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर पाहायला मिळाला. पाकिस्तानने भारताच्या हवाई हद्दीत स्वार्म ड्रोनद्वारे घुसखोरीचा प्रयत्न केला, परंतु भारताने त्यांना प्रत्युत्तर दिले.
हवाई हद्दीचे अनेकदा उल्लंघन
८-९ मे दरम्यानच्या रात्री पाकिस्तान लष्कराने भारताच्या संपूर्ण पश्चिम सीमेवर हवाई हद्दीचे अनेकदा उल्लंघन केले. याचा उद्देश लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे होता, असे विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी कर्नल सोफिया कुरैशी आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर लडाखच्या लेहपासून सर क्रीकपर्यंत ३६ ठिकाणी अंदाजे ३०० ते ४०० ड्रोनच्या माध्यमातून घुसखोरीचा प्रयत्न झाला होता.
माहिती गोळा करण्यासाठी वापर
भारतीय सशस्त्र दलांनी अनेक ड्रोनना काइनेटिक आणि नॉन-काइनेटिक साधनांनी पाडले. या मोठ्या प्रमाणातील हवाई घुसखोरीचे संभाव्य उद्दिष्ट हवाई संरक्षण प्रणालीची चाचणी घेणे आणि माहिती गोळा करणे हे होते, असे सिंह यांनी ९ मे रोजी सांगितले. ड्रोनच्या अवशेषांची फॉरेन्सिक तपासणी केली जात असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.