धोका वाढला! दहशतवाद्यांनी अचानक १५ वर्षे जुना 'तो' मार्ग धरला; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 19:15 IST2021-09-24T19:12:32+5:302021-09-24T19:15:01+5:30
काश्मीरमध्ये घुसखोरीच्या तयारीत असलेल्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा; लष्कराची कारवाई

धोका वाढला! दहशतवाद्यांनी अचानक १५ वर्षे जुना 'तो' मार्ग धरला; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
नवी दिल्ली: काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांनाभारतीय जवानांनी कंठस्नान घातलं आहे. रामपूर सेक्टरमधील रुस्तम बटालियन परिसरात असलेल्या हथलंगा जंगलाजवळ जवानांनी ही कारवाई केली. दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा आढळून आला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरक्षा दलाचे जवान कायमच अशा कारवाया करत असतात. मात्र दहशतवाद्यांच्या या घुसखोरीनं सुरक्षा दलांची चिंता वाढवली आहे. रुस्तम बटालियनच्या हथलंगा परिसरात गेल्या १५ वर्षांत पहिल्यांदाच घुसखोरीचा प्रकार घडला आहे.
२००५ मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तारांचं कुंपण उभारण्यात आलं. त्यानंतर दहशतवाद्यांच्या घुसखोरांचं प्रमाण अत्यंत नगण्य होतं. या भागात असलेल्या सुरक्षा दलाच्या चौक्यांमधून दहशतवाद्यांच्या हालचाली सहज टिपता येतात. त्यामुळे गेल्या दीड दशकात इथून घुसखोरी झाली नव्हती. मात्र आता दहशतवाद्यांनी याच मार्गानं घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच कालावधीपासून घुसखोरीसाठी वापरात नसलेल्या मार्गांवर भारतीय सुरक्षा दलांचं फारसं लक्ष नसावं, या विचारातून हथलंगामध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाला असावा, असं जाणकारांना वाटतं.
"मिस्टर 56 चीनला घाबरतात"; काँग्रेस नेते राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र
नव्या मार्गांचा शोध; स्थानिकांच्या बैठका
घुसखोरीसाठी जुन्या मार्गांचा वापर करता यावा म्हणून सीमेपलीकडे असलेले दहशतवादी स्थानिकांची आणि गाईड्सची मदत घेत असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे. पाकव्याप्त काश्मीरचे रहिवासी आणि गाईड्स यांच्या बैठका सातत्यानं घेतल्या जात आहेत. या बैठकांमध्ये जुने मार्ग पुन्हा वापरण्याबद्दल आणि नवे मार्ग शोधण्यासंदर्भात चर्चा होत आहे. भारतीय लष्कराच्या नजरेस न पडता काश्मीर कसं गाठावं, याबद्दलच्या योजना बैठकीत आखल्या जात आहेत.