पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 05:56 IST2025-05-11T05:55:35+5:302025-05-11T05:56:40+5:30

दक्षिण आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर होता? भारताच्या हल्ल्याने आपली नवी अचूक मारक क्षमता दाखवून दिली होती. त्यामुळे पूर्ण युद्धाला तोंड फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. भारतीय फौजा पश्चिम सीमेच्या आघाडीच्या तळांवर पोहोचल्याची पुष्टी अमेरिकी गुप्तचरांनी दिली होती.

pakistan midnight surrender what happened behind the scenes for the ceasefire and know why did america mediate | पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?

पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने हाती घेतलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे मे २०२५ च्या प्रारंभी दक्षिण आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर उभा होता. भारताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात दूरपर्यंत क्षेपणास्त्रे डागली. त्यातील एक क्षेपणास्त्र पाकिस्तानची पाताळयंत्री गुप्तचर संघटना आयएसआयच्या तळावर आदळले. पाकिस्तानने प्रत्युत्तर देताना भारताची २ जेट विमाने पाडली आणि नियंत्रण रेषेवर तुफान तोफमारा करण्यात आला.

लोकांच्या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या लष्करी योजनाकारांनी वाईटात वाईट घटनेला तोंड देण्याच्या दृष्टीने तयारी केली. मात्र, पडद्याच्या मागे काही वेगळेच घडत होते. पाकिस्तानचे लष्करी मुख्यालय असलेल्या रावळपिंडीतील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य कळाले. भारताच्या हल्ल्याने आपली नवी अचूक मारक क्षमता दाखवून दिली होती. त्यामुळे पूर्ण युद्धाला तोंड फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. भारतीय फौजा पश्चिम सीमेच्या आघाडीच्या तळांवर पोहोचल्याची पुष्टी अमेरिकी गुप्तचरांनी दिली होती.

पाकला दिलेले बेलआऊट पॅकेज हा शांतता कराराचा एक भाग

सीआयए आणि पेंटेंगॉनकडून अलर्ट मिळाल्यानंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना संधी दिसून आली. परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांना त्यांनी मागच्या दाराने चर्चा करण्यासाठी पाठविले. ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या राजधान्यांशी वैयक्तिक संपर्कही कायम केला. भारताने आपली भूमिका कायम ठेवली.
पाकिस्तानत्वा मात्र अमेरिकेने जबरदस्त वाकवले. कमजोर अर्थव्यवस्था, राजनैतिक एकाकीपणा आणि हस्तक्षेपास अनुच्छुक राहून मौन पसंत करणारा चीन यामुळे रावळपिंडी हतबल झाली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) पाकिस्तानला दिलेले बेलआऊट पॅकेज हे शांतता कराराचाच एक भाग आहे, असे सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तान झुकले ते सद्भावनेमुळे नव्हे, तर खेळायला दुसरे कार्डच उरले नव्हते म्हणून..!

१० मे २०२५ रोजी पाकिस्तानच्या लष्करी मोहिमा महासंचालकांनी भारतीय महासंचालकांना फोन केला. 'आमची तणाव कमी करण्याची इच्छा आहे. शस्त्रसंधी करू या', असे त्यांनी शांतपणे सांगितले. त्याआधी मध्यरात्रीपासून अमेरिका पाकिस्तानला शस्त्रसंधीसाठी दटावत होताच.

भारताने पाक अधिकाऱ्याचे म्हणणे ऐकून घेतले, वॉशिंग्टनशी सल्लामसलत केली आणि दहशतवादाचा पाठिंबा तत्काळ थांबविण्याच्या अटीवर शस्त्रसंधीस मान्यता दिली. सूर्योदयापर्यंत शस्त्रसंधी अस्तित्वात आली.

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाच्या आविर्भावात द्विट केले. जगाने सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, बंद कक्षात एक सत्य राहिले: पाकिस्तानी लष्कर झुकले ते स‌द्भावनेमुळे नव्हे, तर त्यांच्याकडे खेळायला कोणते कार्डच उरले नव्हते म्हणून.

 

Web Title: pakistan midnight surrender what happened behind the scenes for the ceasefire and know why did america mediate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.