लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक माताभगिनींचे कुंकू (सिंदूर) त्या दिवशी पुसले गेले. कर्त्या माणसांवर दहशतवाद्यांनी घातलेल्या घाल्याने अवघा देश पेटून उठला. त्या कुंकवाची आण घेऊन भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे मंगळवारी मध्यरात्रीनंतर, बुधवारची पहाट उजाडत असताना अवघ्या पंचवीस मिनिटांत पाकिस्तानातील नऊ ठिकाणचे दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा मारा करीत उद्ध्वस्त केले, तसेच त्यातील १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या भीम पराक्रमानंतर देशवासीयांनी लष्कराला सलाम केला.
दहशतवाद्यांना पोसणारा, आपल्या भूमीतून भारतात व अन्यत्र घातपाती कारवाया घडविणाऱ्या पाकिस्तानचे भारताने लष्करी कारवाईद्वारे कंबरडे मोडायचे ठरविले. त्याला ऑपरेशन सिंदूरने सुरुवात झाली. भारतीय हवाई दलाने अत्यंत अचूकपणे केलेल्या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा यांची दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे, लाँचिंग पॅड तसेच मुख्यालयांवर क्षेपणास्त्र हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. ही कारवाई पाकिस्तानच्या हवाई हद्दीत न शिरता करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पाकिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील ज्या नऊ महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशा ठिकाणांनाच लक्ष्य करण्यात आले. त्यामध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आणि मुरिदकेतील लष्कर-ए-तय्यबाच्या तळाचा समावेश आहे. या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. पाकिस्तानातील चार व पाकव्याप्त काश्मीरमधील पाच ठिकाणी आरोग्य केंद्रांच्या बुरख्याआड दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे चालविली जात होती. भारताने तिथे हल्ला चढवून पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला आहे. १९४७ ते २०१९ पर्यंत वेळोवेळी झालेल्या संघर्षात भारताने पाकिस्तानला नेहमीच धूळ चारली आहे. ऑपरेशन सिंदूरव्दारेदेखील पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या प्रमुख ठिकाणांवरच भारताने घाव घातला असून त्यामुळे पाकिस्तानची अवस्था भेदरलेल्या सशासारखी झाली आहे.
पाकचा जळफळाट, सीमेवर गोळीबार; १६ ठार, जवान शहीदजम्मू/श्रीनगर : पाकिस्तानी सैन्याने बुधवारी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील गावांना लक्ष्य करून जोरदार गोळीबार केला. यात सीमेवरील गावांतील चार मुलांसह १६ जण ठार आणि १५० जण जखमी झाले. तर हरयाणाच्या पलवल येथील तरुण जवान दिनेश कुमार शहीद झाला.
भारतीय सशस्त्र दलांनी दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केल्यानंतर हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानी गोळीबारात सर्वाधिक नुकसान पूंछ जिल्ह्यात झाले आहे. भारतीय सैन्य गोळीबाराला योग्य प्रत्युत्तर देत आहे. शत्रूच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यांच्या बाजूने मोठे नुकसान झाले आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत.
नागरी वस्त्या, लष्करी ठिकाणांवर हल्ले नाहीत : भारताने सांगितले की, भारतीय हवाई दलाने बुधवारी पहाटे केलेली कारवाई ही विशिष्ट लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. आम्ही पाकिस्तानमधील नागरी वस्त्या तसेच कोणत्याही लष्करी ठिकाणावर हल्ला केलेला नाही. ज्या दहशतवादी तळांतून भारतविरोधी कारवाया केल्या जात होत्या तीच ठिकाणे आम्ही नष्ट केली.
आरोग्य केंद्राच्या बुरख्याखाली होता दहशतवादी तळपाकच्या नारोवाल जिल्ह्यातील सरजाल तेहरा कलान येथे आरोग्य केंद्राच्या नावाखाली चालविला जाणारा जैश-ए-मोहम्मदचा असलेला तळ हे दहशतवाद्यांचे लाँचिंग पॅड आहे. हे ठिकाण जम्मूच्या सांबा सेक्टरपासून केवळ ६ किमी अंतरावर आहे आणि येथून बोगद्यांच्या माध्यमातून घुसखोरीसाठी योजना आखली जाते. तसेच ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे व अमली पदार्थ टाकण्याचं कामही इथूनच केलं जाते. तोही तळ हवाई दलाने बुधवारी उडवून दिला.