दहशतवाद्यांच्या जिवाची पाकिस्तानला काळजी; भारत मात्र सोडणार नाही पिच्छा, पुढे काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 08:35 IST2025-05-11T08:34:39+5:302025-05-11T08:35:32+5:30
'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांची ठिकाणे भारताने उद्ध्वस्त केली. यात अनेक कुख्यात दहशतवादी मारले गेले.

दहशतवाद्यांच्या जिवाची पाकिस्तानला काळजी; भारत मात्र सोडणार नाही पिच्छा, पुढे काय होणार?
चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारत व पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी लागू झाली असली तरी मसूद अजहर आणि हाफीज सईदसारख्या दहशतवाद्यांच्या सुरक्षेची काळजी पाकिस्तानकडून घेतली जात आहे. दहशतवादाविरुद्धचा भारताचा लढा कायम राहणार असल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे, पाकिस्तान दहशतवाद्यांच्या जिवाची काळजी करण्यासाठी काय करेल, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांची ठिकाणे भारताने उद्ध्वस्त केली. यात अनेक कुख्यात दहशतवादी मारले गेले. आता शस्त्रसंधी झाली असली तरी लश्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईद आणि जैश-ए-मोहम्मदवा प्रमुख मसूद अजहर याच्यासह भारताच्या मोस्ट वाँटेड यादीतील दहशतवाद्यांच्या जिवावरचा धोका टळलेला नाही. पाकिस्तान लष्कराने सध्या त्यांना अज्ञात स्थळी लपवून ठेवले आहे, असे सांगितले जाते. इब्राहिम मुश्ताक, झाकी-उर-रहमान लखवी, इलियास काश्मिरी, सईद सलाहुद्दीनसह शेकडो दहशतवादी भारताच्या मोस्ट वाँटेड यादीत आहेत.
काय म्हणतात तज्ज्ञ ? : पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे चारही दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. या हल्ल्याचा मास्टरमाइंडसुद्धा जिवंत आहे. भारताकडून त्यांचा शोध घेतला जाईल व पाकिस्तानने यात सहकार्य करायला पाहिजे, असे मत व्हाईस अॅडमिरल (सेवानिवृत्त) सतीश घोरमाडे यांनी व्यक्त केले.