करतारपूर कॉरिडॉर: भूमिपूजन कार्यक्रमासाठी पाकिस्तानकडून सुषमा स्वराज यांना निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 23:20 IST2018-11-24T23:12:40+5:302018-11-24T23:20:40+5:30
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि कॅबिनेट मंत्री नवजोत सिंह यांनाही निमंत्रण

करतारपूर कॉरिडॉर: भूमिपूजन कार्यक्रमासाठी पाकिस्तानकडून सुषमा स्वराज यांना निमंत्रण
इस्लामाबाद/गुरदासपूर: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये निर्माण झालेली कटुता कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्ताननं करतारपूर कॉरिडॉरच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना दिलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. पाकिस्तानमध्ये 28 नोव्हेंबरला करतारपूर कॉरिडॉरचं भूमिपूजन होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होईल.
शीख समुदाय बऱ्याच कालावधीपासून पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा नानक शाहपासून करतारपूरपर्यंत कॉरिडॉर बांधण्याची मागणी करत होता. दोनच दिवसांपूर्वीच भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान सरकारनं भारताच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे. त्यामुळेच भूमिपूजनाच्या समारंभासाठी सुषमा स्वराज यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. याशिवाय पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि कॅबिनेट मंत्री नवजोत सिंह यांनादेखील कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं आहे.
On behalf of Pakistan I have extended an invitation to External Affairs Minister Sushma Swaraj @SushmaSwaraj ,Capt Amarinder Singh @capt_amarinder & Navjot Singh Sidhu @sherryontopp to attend the groundbreaking ceremony at #Kartarpura on 28 Nov, 2018.#PakistanKartarpuraSpirit
— Shah Mahmood Qureshi (@SMQureshiPTI) November 24, 2018
एकीकडे पाकिस्तान कॉरिडॉरच्या भूमिपूजनासाठी जोरदार तयारी करताना भारताकडूनही समारंभाची जय्यत तयारी सुरू आहे. डेरा बाबा नानक-करतारपूर साहेब कॉरिडोरचं भूमिपूजन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार आहे. 26 नोव्हेंबरला हा कार्यक्रम संपन्न होईल. गुरुदासपूरमधल्या मानगावमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अन्न आणि प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.