भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 21:36 IST2025-04-30T21:36:19+5:302025-04-30T21:36:40+5:30
Pakistan India Tension: पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत.

भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
Pakistan India Tension: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारताचे संबंध बिघडले आहेत. भारत कधीही आपल्यावर हल्ला करू शकतो, या भीतीच्या छायेत पाकिस्तान आहे. दरम्यान, आता या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने बुधवारी (30 एप्रिल 2025) गिलगिट आणि स्कार्दूला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली.
परदेशी उड्डाणांवर देखरेख वाढवली
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रीय हवाई सुरक्षा प्रोटोकॉलचा आढावा घेतल्यानंतर उत्तरेकडील भागांना जाणारी उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, परदेशी उड्डाणांवरही कडक देखरेख सुरू करण्यात आली. माहितीनुसार, पाकिस्तान नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाला (CAA) सर्व येणाऱ्या परदेशी विमानांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
भारतासाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद
पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र आधीच बंद केले आहे. या संदर्भात एअरमेनला नोटीस जारी करण्यात आली, ज्यामध्ये सुरुवातीला एका महिन्यासाठी भारतीय विमान कंपन्यांना पाकिस्तानी आकाशातून उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हे निर्बंध भारतीय लष्करी आणि व्हीआयपी विमानांवर देखील लागू होतात.
दोन्ही देशातील तणाव शिगेला
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.
दोन्ही देशांची एकमेकांवर कारवाई
भारताने पाकविरोधात कठोर राजनैतिक आणि धोरणात्मक पावले उचलली. यामध्ये 1960 च्या सिंधू पाणी कराराचे तात्काळ निलंबन, अटारी बॉर्डर बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्काळ निलंबित करणे अशा कारवायांचा समावेश आहे. भारताच्या या निर्णयांनंतर पाकिस्तानने शिमला करार रद्द करणे आणि भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करणे, असे निर्णय घेतले आहेत.