पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 08:19 IST2025-05-07T07:53:01+5:302025-05-07T08:19:35+5:30
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या बाजूने नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला आहे.

पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
Operation Sindoor: भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मंगळवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक मोठे दहशतवादी मारले गेल्याचे म्हटलं जात आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या बाजूने नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात ३ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. गेल्या १२ दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य सीमेवर चिथावणीखोर कारवाया करत आहे. भारतानेही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. भारताच्या या कृतीनंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानने आपल्या कारवाया सुरू ठेवत सामान्य भारतीयांना लक्ष्य केले आहे. पाकिस्तानने एलओसीवर गोळीबार केला. या गोळीबारात ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानी मोर्टार शेलिंगमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पुंछ जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली. भारतीय लष्करानेही याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचेही नुकसान झाले आहे.
पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि जम्मू-काश्मीरच्या पाच जिल्ह्यांमध्ये नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. भारतीय सैन्याने जारी केलेल्या निवेदनात,अंधाधुंद गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्य योग्य प्रत्युत्तर देत आहे, असं म्हटलं. ६ मेच्या मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरील आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गोळीबार केला, ज्यामध्ये तोफखान्याचाही मारा करण्यात आला. याआधीही, पहलगाम हल्ल्यापासून पाकिस्तान सतत युद्धबंदीचे उल्लंघन करत आहे, ज्यावर भारत योग्य उत्तर देत आहे.