पाकिस्तानचे शेपूट वाकडेच; पुन्हा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन, ४ ठिकाणी ड्रोन हल्ला अन् गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 06:43 IST2025-05-13T06:42:24+5:302025-05-13T06:43:38+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला उद्देशून केलेले संबोधन संपले होते. नेमक्या याचवेळी अखनूर, सांबा व कठुआच्या काही भागांत पाकिस्तानी ड्रोनने हल्ला केला.

पाकिस्तानचे शेपूट वाकडेच; पुन्हा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन, ४ ठिकाणी ड्रोन हल्ला अन् गोळीबार
सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच आहे. पाक सैन्याने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून उधमपूर एअरफोर्स स्टेशन, सांबा, कठुआ व अखनूर सेक्टरमध्ये ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. एवढेच नव्हे तर अखनूर, परगवाल, रामगढ व आरएस पुरामध्ये छोट्या शस्त्रांद्वारे गोळीबार केल्याचेही वृत्त आहे.
अखनूर, सांबा व कठुआच्या काही भागांत पाकिस्तानी ड्रोनने हल्ला केला. नेमक्या याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला उद्देशून केलेले संबोधन संपले होते. ज्या भागांत पाकिस्तानी ड्रोन दिसले तेथे भारतीय एअर डिफेन्सकडून त्यावर गोळीबार व तोफांचा मारा करण्यात आला. पाकचे नेमके किती ड्रोनला पाडण्यात आले, याची माहिती उपलब्ध झाली नाही. एवढे नक्की की, या भागांत ब्लॅकआऊट करण्यात आला. जम्मूच्याही काही भागांत ब्लॅकआऊट करण्यात आला. या सर्व धामधुमीत पाक सैन्याने लहान शस्त्रांद्वारे गोळ्या चालवून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
पंजाब, राजस्थानमध्येही पुन्हा ड्रोन
राजस्थानच्या बाडमेर येथे तसेच पंजाबमधील पठाणकोट येथे पुन्हा आकाशात ड्रोनची हालचाल दिसल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले तर होशियारपूरमध्ये काही ठिकाणी स्फोटाचे आवाज आल्याचे वृत्त आहे. अमृतसर आणि होशियारपूर जिल्ह्यात ब्लॅकआऊट करण्यात आला.
जालंधरमध्ये ड्रोन पाडले
पंजाबमधील जालंधर येथे रात्री एक ड्रोन आढळला. हा ड्रोन सशस्त्र दलांनी पाडला आहे. या संदर्भात जालंधरचे उपायुक्त हिमांशू अग्रवाल यांनी सांगितले. रात्री ९.२० वाजता मांड गावाजवळ सशस्त्र दलांनी एक देखरेख करणारा ड्रोन खाली पाडल्याची माहिती मला मिळाली आहे. तज्ज्ञांची एक टीम त्याचे अवशेष शोधत आहे. तत्पूर्वी, सुरणासी परिसरात ड्रोनची हालचाल असल्याच्या अहवालानंतर खबरदारी म्हणून काही भागातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता, अशी माहिती देण्यात आली.