पाकबरोबरची २ एप्रिलची कॉरिडॉरवरील चर्चा रद्द; समितीमध्ये खलिस्तानी समर्थकाचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 02:28 IST2019-03-30T02:28:04+5:302019-03-30T02:28:28+5:30
कर्तारपूर कॉरिडॉरच्या पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानबरोबर २ एप्रिल रोजीची चर्चेची नियोजित दुसरी फेरी भारताने शुक्रवारी रद्द केली.

पाकबरोबरची २ एप्रिलची कॉरिडॉरवरील चर्चा रद्द; समितीमध्ये खलिस्तानी समर्थकाचा समावेश
नवी दिल्ली : कर्तारपूर कॉरिडॉरच्या पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानबरोबर २ एप्रिल रोजीची चर्चेची नियोजित दुसरी फेरी भारताने शुक्रवारी रद्द केली. तत्पूर्वी, केंद्र सरकारने पाकिस्तानच्या राजदूताला बोलावून करतारपूर कॉरिडॉर समितीमध्ये वादग्रस्त खलिस्तानी सहानुभूतीदार गोपाल सिंग चावला याचा समावेश केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्रबंधक समितीत चावलाच्या समावेशाबद्दल भारताने जी काळजी व्यक्त केली त्याबद्दल पाकिस्तानकडून उत्तर आल्यानंतरच कॉरिडॉरच्या विषयावर पुढील बैठक ठरवली जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या राजदूताला सांगितल्याचे समजते.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद फैजल यांनी भारताचा निर्णय दुर्बोध असल्याचे टिष्ट्वटरवर म्हटले. जे मुद्दे प्रलंबित आहेत त्यांच्यावर चर्चा करून सहमती घडविण्यासाठी बैठक होणार होती. पाकिस्तानचा दृष्टिकोन विचारात न घेता अगदी शेवटच्या क्षणी बैठक लांबणीवर टाकणे विशेषत: १९ मार्च रोजीची तांत्रिक बैठक फलदायी ठरलेली असताना, असा निर्णय अगम्य आहे, असे फैजल म्हणाले. करतारपूर कॉरिडॉरचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी केला जाऊ नये, असे भारताने याआधीच स्पष्ट केले होते.
कोण आहे चावला
चावला याचे कुख्यात दहशतवादी व लश्कर- ए- तय्यबचा सहसंस्थापक हाफीज सईद याच्याशी जवळचे संबंध आहेत. करतारपूर साहिब गुरुद्वाराला जे भारतीय यात्रेकरू भेट देऊ इच्छितात त्यांना मदत करण्यासाठीच्या पाकिस्तान शीख गुरुद्वारा समितीत चावला याचा समावेश आहे.