धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 08:05 IST2025-04-24T08:04:56+5:302025-04-24T08:05:42+5:30

१४ ऑगस्ट १९९३ रोजी पहिल्यांदा किश्तवाडमध्ये १७ हिंदू यात्रेकरूंना वेगळे करून केली होती हत्या

Pahalgam Terror Attack: This is not the first time that people have been shot because of religion; when has this happened before? | धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?

धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?

सुरेश डुग्गर

जम्मू : पहलगाममधील बैसरन घाटीवर धर्म विचारून पर्यटकांवर गोळीबार करण्याची ही पहिलीच घटना नाही. याची सुरुवात ३२ वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी किश्तवाडच्या सरथल भागात एका प्रवासी बसमधून १७ हिंदूंना वेगळे करत त्यांची हत्या केली होती. जम्मू-काश्मीरमधील हा पहिला सर्वात मोठा नरसंहार होता. त्यामुळे दहशतवादी काश्मीरमध्ये स्वातंत्र्यासाठी लढत नव्हते तर ते धर्माच्या नावाखाली अशांतता निर्माण करण्यासाठी आले होते हे स्पष्ट झाले होते. त्यावेळी तसेच आताही आलेले दहशतवादी दुसऱ्या देशाचेच होते.

किश्तवाड घटनेनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये धर्म तपासून हत्या करण्याची मालिका सुरू झाली. आजपर्यंत दहशतवाद्यांनी अनेक जणांची हत्या केली. या सर्व हत्याकांडांमध्ये एक-दोन वगळता हिंदूंनांच लक्ष्य केले गेले. २००६ नंतर अशा हत्या थांबल्या असल्या तरी १ जानेवारी २०२३ मध्ये राजौरी जिल्ह्यातील डांगरी गावात दहशतवाद्यांनी सात हिंदूंची आधार कार्ड तपासल्यानंतर हत्या केल्याच्या घटनेने अधिकाऱ्यांना धक्का बसला. १३६ हत्यांमध्ये काश्मीरमधीलच लोकांना टार्गेट करण्यात आले होते. मात्र, आता संपूर्ण भारतातील लोकांना टार्गेट करण्यात आल्याने चिंता वाढली आहे.

१९९३ पासून आतापर्यंत हिंदुंना टार्गेट करून मारल्याच्या प्रमुख घटना
१३-१४ ऑगस्ट १९९३ किश्तवाड शहरातील सरथल-किश्तवाड रस्त्यावर एका प्रवासी बसमधून बाहेर काढून १७ हिंदू प्रवाशांची हत्या करण्यात आली.
५ जानेवारी १९९६ किश्तवाड बरशाळा येथे येथे १६ हिंदूंची हत्या.
६ मे १९९६ रामबन तहसीलच्या सुंबर गावात १७ हिंदूंची हत्या.
२५ जून १९९६ डोडाच्या सियुधार भागात १३ जणांचा मृत्यू.
२६ जानेवारी १९९८ काश्मीरमधील वंदहामा गावात २३ काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली.
१७ एप्रिल १९९८ उधमपूरच्या प्राणकोट आणि धाकीकोट गावात २९ लोक मारले गेले.
१९ जून १९९८ - डोडा येथे हिंदूंच्या लग्न सोहळ्यात २९ पाहुण्यांची हत्या. ३ नवरदेवांनाही मारले.
२७ जुलै १९९८ किश्तवाडमधील छिन्हाठकुरायी आणि श्रवण गावात २० हिंदूंची हत्या.
२९ जून १९९९ अनंतनागच्या संथू गावात १२ बिहारी कामगारांची हत्या करण्यात आली.
२० मार्च २००० छत्तीसिंग पोरा येथे ३६ शिखांची हत्या.
१ ऑगस्ट २००० - पहलगाममध्ये ३२ लोकांची हत्या. यात २९ अमरनाथ यात्रेकरूंचाही समावेश.
४ ऑगस्ट २००१ डोडा जिल्ह्यातील किश्तवाड तहसीलच्या सरुतधार भागात १६ हिंदूंची हत्या.
१४ मे २००२ जम्मूतील कालुचक येथे झालेल्या भयानक हत्याकांडात ३४ हिंदूंची हत्या करण्यात आली.
१३ जुलै २००२  कासिमनगर येथे झालेल्या हत्याकांडात २९ जणांची हत्या. मृत्युमुखी पडलेले सर्व जण स्थलांतरित कामगार होते.
६ ऑगस्ट २००२  नुनवान-पहलगाम येथे अमरनाथ यात्रेकरूंची हत्या, १० जण ठार.
२३ मार्च २००३ - पुलवामा येथील छोपिया येथे दहशतवाद्यांनी २४ काश्मिरी पंडितांची हत्या केली.
३० एप्रिल २००६- उधमपूरच्या बसंतगडमध्ये सात हिंदूंची आणि डोडाच्या कुलहान भागात २२ हिंदूंची हत्या.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
हल्ल्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोंगराळ भागांसह पर्यटनस्थळे सुरक्षित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अधिवक्ता विशाल तिवारी यांनी पर्यटनस्थळांवर पर्यटकांची सुरक्षा बळकट करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाला आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली. देशात अनेक पर्यटनस्थळे असे आहेत जेथे देशभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर जात असतात. अमरनाथ यात्रा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. अशात, पर्यटकांच्या जीवाची सुरक्षा सुनिश्चित करणे ही सरकारची जबाबदारी आहे. अनेक राज्यांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

Web Title: Pahalgam Terror Attack: This is not the first time that people have been shot because of religion; when has this happened before?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.