"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 16:25 IST2025-04-30T16:24:15+5:302025-04-30T16:25:12+5:30
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे.

"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं जात आहे. याच दरम्यान जम्मू-काश्मीरहून परतलेले पर्यटक श्रीजित रमेशन म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी घटनेबाबत एनआयएच्या तपासात ते सहकार्य करतील. श्रीजीत रमेशन यांनी २६ एप्रिल रोजी दावा केला होता की, त्यांच्याकडे एक व्हिडीओ आहे ज्यामध्ये दोन दहशतवादी दिसत आहेत. या संदर्भात एनआयएच्या टीमने त्याच्याशी संपर्क साधला आहे.
एनआयए मुख्यालयातून आला फोन
श्रीजीत रमेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मला मुंबईतील एनआयए मुख्यालयातून फोन आला. त्यानंतर, मी एसपी, एनआयए मुंबई, डीवायएसपी आणि तांत्रिक टीमसह उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी जवळजवळ पाच तास चर्चा केली. चर्चेदरम्यान, त्यांनी माझा प्रवास कसा सुरू झाला, मी कुठे राहिलो, मी कोणते हॉटेल बुक केलं, माझ्यासोबत कोणते स्थानिक टूर ऑपरेटर आणि ड्रायव्हर्स होते आणि इतर तपशीलवार माहिती विचारली. मी माझ्याकडून सर्व माहिती त्यांच्यासोबत शेअर केली आहे. जरी मला चौकशीसाठी दिल्लीला बोलावले तरी मी नक्कीच जाईन.
१२ सेकंदांचा मुलीचा व्हिडीओ
श्रीजीथ रमेशन 26 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधून परतले. त्यांनी सांगितलं की, १८ एप्रिल रोजी ते पहलगाममधील त्याच ठिकाणी भेट देण्यासाठी गेले होते जिथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. इथे त्यांनी त्यांच्या मुलीचं रील शूट केलं. फक्त १२ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये दोन लोक निघून जाताना दिसत आहेत. पर्यटकाचा दावा आहे की, हे दोघेही तेच दहशतवादी असू शकतात ज्यांचं स्केच घटनेनंतर सुरक्षा दलांनी जारी केलं होतं. त्यांनी सांगितलं की त्यांनी हे फोटो आणि व्हिडिओ राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) सोपवले आहेत.
श्रीजीत रमेशन म्हणाले, आम्ही १८ एप्रिल रोजी पहलगाममध्ये होतो. तिथून आम्ही ७.५ किमी अंतरावर असलेल्या दुसऱ्या ठिकाणी गेलो. गुलमर्गमध्ये वेळ घालवल्यानंतर, जेव्हा आम्ही पुण्याला परतत होतो, तेव्हा आम्हाला पहलगाममधील हल्ल्याची माहिती मिळाली. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे फोटो प्रसिद्ध केल्यानंतर आम्हाला वाटलं की आम्ही यापैकी दोघांना कुठेतरी पाहिलं आहे. गुलमर्ग, पहलगाम आणि इतर ठिकाणी मोबाईलवरून फोटो आणि व्हिडीओ काढले होते. पहलगाममध्ये बनवलेल्या व्हिडिओमध्ये दहशतवाद्यांसारखे दिसणारे दोन लोक दिसले.