सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 09:19 IST2025-04-25T07:33:50+5:302025-04-25T09:19:43+5:30
पाकच्या सहभागाचा ठोस पुरावा हाती, ज्या वेगाने ही आश्रयस्थाने सूत्रधारांनी आणि पाकिस्तानी सैन्याने हटवली त्यावरून यामागे कुटिल षडयंत्र असल्याचे दिसून येते.

सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील एका खास गुप्तचर अहवालातून पाकिस्तानचा पहलगाम हल्ल्यामागे हात असल्याचा ठोस पुरावा हाती लागला आहे. या अहवालात हल्ल्यात सहभागी दहशतवादी आणि त्यांच्या पाकिस्तानी सूत्रधारांमधील संबंध प्रस्थापित करणाऱ्या दोन पकडलेल्या संभाषणांचा तपशील आहे.
या अहवालानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला. या संभाषणावरून मुझफ्फराबाद व कराचीच्या आश्रयस्थानांशी जोडलेल्या डिजिटल फूटप्रिंट्सशी संबंध असल्याचे दिसून आले. ज्या वेगाने ही आश्रयस्थाने सूत्रधारांनी आणि पाकिस्तानी सैन्याने हटवली त्यावरून यामागे कुटिल षडयंत्र असल्याचे दिसून येते. डिजिटल ट्रॅकिंग काही तासांतच करण्यात आले.
२० लाखांचे बक्षीस जाहीर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुरुवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या तिघांचे रेखाचित्रे जारी केली आहेत. पोलिसांनी दोन संशयितांची ते पाकिस्तानी नागरिक असल्याची ओळख पटवली असून आणि त्यांच्या अटकेची माहिती देणाऱ्यांना २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
अहवालात काय? बिजबेहरा येथील आदिल हुसेन ठोकर आणि त्राल येथील आसिफ शेख या दोन स्थानिकांचा सहभाग उघड झाला आहे. आदिल २०१८ मध्ये पाकिस्तानला गेला होता. तो या वर्षीच परतला होता. परंतु आसिफबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.