अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 07:27 IST2025-04-26T07:27:16+5:302025-04-26T07:27:50+5:30
अमेरिकेसाठी आम्ही हे घाणेरडे काम केले, आता त्या चुकीची शिक्षा भोगावी लागतेय

अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
लंडन - पाकिस्ताननेच आतापर्यंत दहशतवाद्यांना पोसले असल्याचे सत्य अखेर समोर आले आहे. खुद्द पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी याची कबुली दिली आहे. आमच्या देशाने गेल्या ३० वर्षांपासून दहशतवाद्यांना पाठिंबा, प्रशिक्षण आणि निधी देण्याचे काम केले आहे. अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांसाठी हे ‘घाणेरडे काम’ आम्हाला करावे लागत असून, पाकिस्तानला या चुकीची किंमत मोजावी लागली आहे, अशी कबुली पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे.
ख्वाजा आसिफ यांनी शुक्रवारी ब्रिटिश वृत्तपत्र ‘द स्काय’ला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे. ब्रिटिश अँकर यल्दा हकीम यांनी त्यांना विचारले की, दहशतवादी गटांच्या कारवायांसाठी पाकिस्तान जबाबदार आहे का? यावर ते म्हणाले की, जागतिक शक्तींनी त्यांच्या फायद्यासाठी पाकिस्तानचा वापर केला. आसिफ यांनी कबूल केले की, दहशतवाद्यांना पाठिंबा देणे किंवा प्रशिक्षण देणे ही एक मोठी चूक होती. याची शिक्षा आम्ही भोगत आहोत. जर आपण सोव्हिएत युनियनविरुद्धच्या युद्धात सामील झालो नसतो आणि ९/११ च्या हल्ल्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली, ती झाली नसती तर पाकिस्तानचे रेकॉर्ड निष्कलंक राहिले असते.
आजचे हे सर्व दहशतवादी वॉशिंग्टनमध्ये मजा करत होते
या प्रदेशात जे काही घडत आहे, त्यासाठी पाकिस्तानला दोष देणे मोठ्या शक्तींना सोयीस्कर आहे. १९८० च्या दशकात जेव्हा आम्ही सोव्हिएत युनियनविरुद्ध त्यांच्या वतीने युद्ध लढत होतो, तेव्हा आजचे हे सर्व दहशतवादी वॉशिंग्टनमध्ये मजा करत होते आणि मग ९/११ चा हल्ला झाला. तीच परिस्थिती पुन्हा घडली. मला वाटते की आमच्या सरकारांनी त्यावेळी चूक केली होती. त्यावेळी पाकिस्तानचा वापर ‘प्रॉक्सी’ (मुखवटा) म्हणून केला जात होता, असेही त्यांनी सांगितले.
ती दहशतवादी संघटनाच संपली
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानवर लावलेले आरोप आणि हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ‘द रेझिस्टेन्स फ्रंट’ची बंदी घातलेली संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी)शी संबंध असल्याबद्दल मंत्र्यांना विचारण्यात आले असता आसिफ म्हणाले की, लष्कर-ए-तैयबा आता पाकिस्तानात नाही. ती संपली आहे. जर मूळ संघटना अस्तित्वात नसेल तर येथे शाखा कशी निर्माण होऊ शकते?
...तर थेट युद्ध होईल, दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानला तणाव वाढण्याची भीती आहे का, असे विचारले असता, मंत्री म्हणाले की, पाकिस्तान त्यांच्या पद्धतीनेच प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. भारताच्या कोणत्याही कारवाईला आम्ही तसाच प्रतिसाद देऊ. हे एक विचारपूर्वक उचललेले पाऊल असेल. जर ताकदीने हल्ला झाला किंवा असे काही झाले तर थेट युद्ध होईल. दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे असल्याने जगाने काळजी करावी, असे ते म्हणाले. मात्र, दोन्ही देश चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.