Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्ताविरोधात अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत. यात सिंधू करार रद्द करणे, पाकिस्तानी नागरिकांना हाकलून लावणे, यासारख्या निर्णयांचा समावेश आहे. याशिवाय, भारतानेपाकिस्तानविरोधात यापेक्षाही मोठी कारवाई करण्यासाठी अनेक देशांचा पाठिंबा मिळवला आहे. अशातच आता भारत पाकिस्तानवर आर्थिक हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आशियाई विकास बँकेचे (ADB) अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट घेऊन पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत थांबवण्याची मागणी केली आहे. मसाटो व्यतिरिक्त, अर्थमंत्र्यांनी इटलीचे अर्थमंत्री जियानकार्लो जॉर्जेट्टी यांचीही भेट घेऊन याच मागणीचा पुनरुच्चार केला. दहशतवादाचे संरक्षण आणि प्रोत्साहन देणाऱ्यांना आर्थिक निधी देऊ नये, असे भारताने स्पष्ट केले. तसेच, पाकिस्तानला आयएमएफकडून मिळणाऱ्या 7 अब्ज डॉलर्सच्या पॅकेजवरही भारताने प्रश्न उपस्थित केला आहे.
पाकिस्तानला मदत का मिळते?पाकिस्तानची आर्थिक स्थिती खूपच वाईट आहे. अशा परिस्थितीत, जगातील अनेक बँकांकडून अब्जावधी डॉलर्सची मदत दिली जाते, जसे की ADB आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. विकास, हवामान बदलाशी लढा, रस्ते बांधणी, वीज इत्यादी क्षेत्रांसाठी ही मदत दिली जाते. पण, पाकिस्तान या पैशांचा वापर दहशतवादासाठी करतो. त्यामुळेच आता भारताने अशाप्रकारची आर्थिक मदत थांबवण्याची मागणी केली आहे. तसेच, पाकिस्तानला पुन्हा FATF च्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची मागणीही केली आहे.