जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 19:20 IST2025-04-25T19:20:20+5:302025-04-25T19:20:40+5:30
Pahalgam Terror Attack: कठुआ जिल्ह्यातील एका महिलेला चार संशयित दहशतवादी आढळले, महिलेने तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली.

जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण जम्म-काश्मीर हाय अलर्टवर आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दल राज्यातील वेगवेगळ्या भागात तीव्र शोध मोहीम राबवत आहे. आतापर्यंत अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. अशातच, कठुआ जिल्ह्यात एका महिलेने चार संशयितांना पाहिल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्येही सुरक्षा दलांची तैनाती वाढवण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय सीमेजवळ संशयित आढळले
जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG) आणि स्थानिक पोलिस संयुक्तपणे परिसरात शोध मोहीम राबवत आहेत. महिलेने संशयितांना पाहिल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. ज्या ठिकाणी ही शोध मोहीम राबवली जात आहे, ती जागा आंतरराष्ट्रीय सीमेच्या अगदी जवळ आहे. या भागातून यापूर्वीही घुसखोरीचे अनेक प्रयत्न झाले आहेत.
उधमपूर, राजौरीसह या भागात शोध मोहीम सुरू
जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील जंगली भागात फरार दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संरक्षण दलांकडून शोध मोहीम सुरू आहे. याशिवाय किश्तवाड, कठुआ, राजौरी आणि पूंछ या भागातही शोध मोहीम राबवली जात आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, दुड्डू-बसंतगडमध्ये लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) विशेष दलांकडून शोध मोहीम सुरू आहे. या मोहिमेत हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या माध्यमातून हवाई देखरेख केली जात आहे.
उधमपूरमध्ये एक जवान शहीद
उधमपूरमधील दुडू-बसंतगड भागात गुरुवारी (24 एप्रिल 2025) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या विशेष दलाचा एक जवान शहीद झाला. हवालदार झंटू अली शेख, असे याशहीद जवानाचे नाव असून, तो स्पेशल फोर्सेसच्या 6 पॅरा ट्रुपचा भाग होता.