"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 13:32 IST2025-04-29T13:18:03+5:302025-04-29T13:32:48+5:30

भारतीय सैन्यावर अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या शाहिद आफ्रिदीला शिखर धवनने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Pahalgam Attack Shikhar Dhawan responds to Shahid Afridi derogatory remarks on Indian Army | "कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

Shikhar Dhawan on Shahid Afridi: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे समोर येत आहे. मात्र पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी  हे मान्य करायला तयार नाही. शाहिद आफ्रिदीने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे पुरावे भारताकडून मागितले होते. तसेच या हल्ल्यासाठी भारतीय सैन्यालाही जबाबदार धरलं. यावरुनच भारतीय क्रिकेकटपटू शिखर धवनने आफ्रिदीला सुनावलं आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत केलेल्या विधानामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर सर्व बाजूंनी टीका होत आहे. भारतीय सैन्यावर अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या शाहिद आफ्रिदीला शिखर धवनने चोख प्रत्युत्तर दिले आहे. माजी भारतीय क्रिकेटपटूने सोशल मीडियावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर टीका केली. तुम्ही अजून किती खालच्या पातळीवर जाणार आहात असं शिखर धवनने  म्हटलं आहे.

"तुम्हाला कारगिलमध्ये सुद्धा हरवलं होतं. आधीच तुम्ही इतके खालच्या पातळीवर गेला आहात, आणखी किती खाली जाल? अनावश्यक टिप्पण्या करण्याऐवजी, तुमच्या देशाच्या प्रगतीसाठी डोकं लावा. शाहिद आफ्रिदी आम्हाला आमच्या भारतीय सैन्याचा खूप अभिमान आहे. भारत माता की जय! जय हिंद!," असं शिखर धवन याने म्हटलं आहे.

शाहिद आफ्रिदीने काय म्हटलं?

"त्या दहशतवाद्यांनी एक तास तिथे दहशतवाद माजवली होती पण तुमच्या ८ लाख सैनिकांपैकी कोणीही तिथे गेले नाही आणि जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी १० मिनिटांत पाकिस्तानला दोष दिला. ते स्वतःच चुका करतात, ते स्वतःच लोकांना मारतात आणि नंतर ते स्वतःच व्हिडीओ दाखवतात आणि म्हणतात की ते जिवंत आहेत. असं करु नका. पाकिस्तान हा आमचा धर्म आहे, इस्लाम शांततेबद्दल बोलतो. आम्ही भारतासोबत चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आम्हाला तिथून नेहमीच धमक्या येत असतात. आम्हाला माहितही नव्हते की आम्ही तिथे खेळायला जाऊ की नाही. २०१६ च्या विश्वचषकात मी कर्णधार होतो, आम्ही लाहोरमध्ये होतो आणि आम्हाला माहित नव्हते की आमचे भारतात विमान असेल की नाही. म्हणूनच मी म्हणतो की स्पोर्टस डिप्लोमसी ही सर्वोत्तम आहे. तुमचा कबड्डी संघ येतो, पण क्रिकेट संघ येत नाही. जर तुम्हाला करायचे असेल तर ते पूर्णपणे बंद करा अन्यथा ते करू नका," असे शाहिद आफ्रिदीने म्हटलं होतं.

Web Title: Pahalgam Attack Shikhar Dhawan responds to Shahid Afridi derogatory remarks on Indian Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.