गेल्या दोन आठवड्यांमध्ये भारतात गुप्तचर नेटवर्कशी संबंधित मोठी कारवाई करण्यात आली असून, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली किमान १२ जणांना अटक करण्यात आली आहे. या अटकेत हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राचाही समावेश आहे. तपासानुसार, अटक करण्यात आलेले सर्व आरोपी उत्तर भारतात कार्यरत असलेल्या एका परकीय गुप्तचर संस्थेशी जोडलेले होते. अटक केलेल्या आरोपींपैकी सहा जण पंजाबमधून, तर चार जण हरियाणामधून पकडले गेले आहेत.
ज्योती मल्होत्राची अटक आणि चौकशी
१६ मे रोजी हरियाणा पोलिसांनी हिसार येथून ज्योती मल्होत्राला अटक केली. ती 'ट्रॅव्हल विथ जो' नावाचे युट्यूब चॅनल चालवत असून, तिच्या चॅनेलला ३.७७ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती भारतासंबंधित अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला पुरवत होती. तिच्यावर अधिकृत गुपित कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या ती पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे.
पहलगाम घटना ही सरकार आणि पर्यटकांची चूक : ज्योती मल्होत्रापहलगाम हल्ल्यानंतरच्या व्हिडिओवर ज्योती मल्होत्रा म्हणाली की, जे काही घडले ते पर्यटकांच्या चुकीमुळे झाले. जेव्हा आपण कुठेतरी बाहेर फिरायला जातो, तेव्हा आपण सतर्क आणि जागरूक राहिले पाहिजे. पहलगाम घटनेसाठी तिने भारत सरकारला देखील दोष दिला आणि म्हणाली की, पहलगाममध्ये योग्य सुरक्षा व्यवस्था नव्हती.
व्हिडीओ कंटेंट आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दावा
चौकशीदरम्यान, ज्योती मल्होत्राने सांगितले की तिने बनवलेले व्हिडीओ तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग होते. पाकिस्तानी लोकांविषयी तिने काही वेळा सकारात्मक मत मांडले असले, तरी ती युट्यूबच्या माध्यमातून तिचा वैयक्तिक दृष्टिकोन मांडत होती, असे तिचे म्हणणे आहे. यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अपलोड केलेल्या एका व्हिडिओचा विशेष उल्लेख आहे, ज्यामध्ये तिने हल्ल्यामध्ये सरकार आणि पर्यटकांची चूक असल्याचे म्हटले.
ऑपरेशन सिंदूर दरम्यानही पाकिस्तानच्या संपर्कात होती ज्योती!हिसार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, २०२३ मध्ये ज्योती मल्होत्रा पाकिस्तान उच्चायुक्तालयात व्हिसासाठी गेली असताना तिची ओळख ‘दानिश’ नावाच्या व्यक्तीशी झाली. याच दानिशच्या माध्यमातून तिचा कथितरित्या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी संपर्क झाला. याच वेळी तिला भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. पोलीस तपासात असा दावा करण्यात आला आहे की, ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि भारत-पाकिस्तानदरम्यान चाललेल्या संघर्षाच्या काळातही ती पाकिस्तानच्या संपर्कात होती.