"मला ३ वर्षांचा मुलगा आहे..."; विनंती करुन दहशतवाद्यांनी ऐकलं नाही, पत्नीने सांगितली हत्येची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 20:02 IST2025-04-24T19:45:02+5:302025-04-24T20:02:31+5:30

पहलगाम हल्ल्यात बंगळुरुतील अभियंत्याला पत्नी आणि मुलासमोरच दहशतवाद्यांनी संपवले.

Pahalgam attack Bengaluru engineer Bharat Bhushan was killed by terrorists in front of his wife and child | "मला ३ वर्षांचा मुलगा आहे..."; विनंती करुन दहशतवाद्यांनी ऐकलं नाही, पत्नीने सांगितली हत्येची कहाणी

"मला ३ वर्षांचा मुलगा आहे..."; विनंती करुन दहशतवाद्यांनी ऐकलं नाही, पत्नीने सांगितली हत्येची कहाणी

Pahalgam Terrorist Attack: जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारताला हादरवून सोडलं आहे. पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी निर्घृणपणे २६ जणांची गोळ्या झाडून हत्या केली. पर्यटनासाठी आलेल्या लोकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्माच्या आधारावर वेगळं केलं आणि हिंदू पर्यटकांवर गोळ्या चालवल्या. या भयानक हल्ल्यानंतर अनेकांच्या दुर्दैवी कहाण्या समोर आल्या आहेत. बंगळुरुतील भरत भूषण यांचीही दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलासमोरच हत्या केली. दहशतवाद्यांना आम्ही खूप विनवणी केली पण त्यांनी ऐकले नाही आणि भरतवर गोळी झाडली असे पत्नी रेणुका भूषण यांनी सांगितले.

मंगळवारी बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला. मृतांमध्ये बंगळुरूचे सॉफ्टवेअर इंजिनियर भरत भूषण यांचाही समावेश होता. दहशतवाद्यांनी भरत भूषण यांना पत्नी रेणुका भूषण आणि तीन वर्षांच्या मुलासमोर संपवले. भरत यांनी आपल्याला तीन वर्षांचा मुलगा आहे असं सांगून सोडून देण्याची याचना केली होती. तरीही दहशतवाद्यांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडली. मी विनंती करत असतानाही त्यांनी माझ्या पतीवर गोळ्या झाडल्या असे रेणुका भूषण यांनी सांगितले.

सहलीच्या शेवटच्या दिवशीच पतीचा मृत्यू

"आम्ही १८ एप्रिल रोजी काश्मीरला गेलो होतो. आमच्या तिथल्या शेवटच्या दिवशी आम्ही पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये गेलो होता. आम्ही ते सुंदर ठिकाणी पोहोचण्यासाठी उत्सुक होतो. बैसरनला पोहोचण्यासाठी आम्ही सुमारे तीन ते चार किलोमीटरचा प्रवास घोड्यावरून केला होता. आम्ही एका मोठ्या गवताळ मैदानात बसलो होतो आणि आमच्या लहान मुलासोबत खेळत होतो. तिथे तंबू होते जिथे पर्यटक पारंपारिक काश्मिरी पोशाख घालू शकत फोटो काढत होते. फोटोशूटनंतर, आम्ही दुपारच्या जेवणासाठी तिथून निघण्याची तयारी करत होतो. दुपारी १.४५ च्या सुमारास आम्हाला गोळीबाराचा आवाज ऐकू आले. सुरुवातीला आम्हाला वाटले की कोणीतरी प्राण्यांना घाबरवण्यासाठी गोळीबार करत असेल. पण गोळीबाराचा आवाज जवळजवळ येऊ लागल्याने आम्हाला कळले की हा हल्ला आहे. मी आणि माझे पती आमच्या मुलासह एका तंबूच्या मागे लपलो," असे रेणुका यांनी सांगितले. 

वृद्धावर झाडल्या पाच गोळ्या

"एक दहशतवादी आमच्यापासून १०० फूट अंतरावर असलेल्या तंबूत गेला आणि त्याने एका माणसाला बाहेर काढले. त्याच्याशी तो बोलू लागला आणि त्याच्या डोक्यात गोळी झाडली. त्याने दोन वेळा तसेच केले. त्यानंतर दहशतवाद्याने एका वृद्ध माणसाला बाहेर काढलं आणि त्याला आमची मुले तिथे मरत असताना तुम्ही इथे इतके आनंदात कसे राहू शकता? तुम्ही तुमच्या मुलांसोबत वेळ कसा घालवू शकता आणि आनंदी कसे राहू शकता? असं म्हटलं. त्यावर त्या वृद्ध माणसाने मी काय करु शकतो असं विचारलं. त्यावर उत्तर न देता त्याने त्या वृद्धाला गोळी मारली आणि त्याचे शरीर बाजूला ढकलले. त्यानंतर त्याने आणखी चार-पाच गोळ्या झाडल्या," असेही रेणुका भूषण यांनी म्हटलं.

मी डोकं खाली घालून होते

"त्या क्षणी, माझ्या पतीने आम्हाला धीर प्रयत्न केला आणि म्हटलं की सर्व काही ठीक होईल. त्यानंतर दहशतवादी आमच्या जवळ आला. मी माझ्या मुलाला घट्ट पकडले आणि हात जोडून दयेची याचना केली आणि त्याला सांगितले की आमचे एक लहान मूल आहे. माझ्या विनंतीकडे दुर्लक्ष करून, दहशतवाद्याने भूषणच्या डोक्यात गोळी झाडली. मला माहित होते की तो वाचणार नाही. मी माझे डोकेही वर केले नाही. मी फक्त माझ्या मुलाला घट्ट मिठी मारली होती आणि काही करुन त्याला वाचवण्याचे ठरवले होते. तो दहशतवादी तिथून जाताच मी माझ्या मुलाला पकडले आणि तिथून पळाले. धावत असताना मला मृतदेहांचे ढीग दिसले. इतर अनेक जणही पळत होते. मी घोडा शोधण्यात यशस्वी झाले आणि त्यावर स्वार होऊन सीआरपीएफ छावणीत गेले," असेही रेणुका म्हणाल्या.

Web Title: Pahalgam attack Bengaluru engineer Bharat Bhushan was killed by terrorists in front of his wife and child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.