५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 05:02 IST2025-05-16T05:00:42+5:302025-05-16T05:02:37+5:30

अनंतनाग जिल्ह्यातील गजबजलेला आणि निसर्गरम्य परिसर असलेला पहलगाम आता सुनसान झाला आहे. पर्यटकांनी फुलून गेलेले हे ठिकाण आता ओसाड झाले आहे.

pahalgam 5000 horsemen 600 drivers unemployed after terrorist attack tourists left and kashmiri in crisis | ५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात

५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात

सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे या भागातील पर्यटन उद्योगाला जबर धक्का बसला असून पर्यटकांनी फुलून गेलेलं हे ठिकाण आता ओसाड झाले आहे. पर्यटनावर अवलंबून असलेले जवळपास ५,००० घोडेवाले आणि सुमारे ६०० वाहनचालक आता उपजीविकेविना दिवस कंठत आहेत.

अनंतनाग जिल्ह्यातील गजबजलेला आणि निसर्गरम्य परिसर असलेला पहलगाम आता सुनसान झाला आहे. काश्मीरमधील मिनी स्वित्झर्लंड अशी ख्याती असलेल्या बैसरन खोऱ्यात २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ल्यात २६ जणांची हत्या करण्यात आली. पर्यटन हंगाम एप्रिलपासून सुरू होऊन ऑक्टोबरपर्यंत चालतो. मात्र हा हल्ला झाल्यामुळे पर्यटक फिरकत नाहीत. 

‘पर्यटकांनी पहलगामला येणे थांबवू नये’

पोनीवाला असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल वहीद वानी यांनी सांगितले की, ५ हजारांहून अधिक घोडेवाले कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेत आहेत. पहलगामची संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हे अतिशय वाईट कृत्य आहे. मात्र पर्यटकांनी पहलगामला येणे थांबवू नये.

सीमाभागातील रहिवासी वावरतात भीतीच्या सावटाखाली

भारत व पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली असल्यामुळे सध्या जम्मू-काश्मीर व अन्य सीमावर्ती भाग शांत आहे. मात्र सीमेपलीकडून होणारा गोळीबार, तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे तेथील लोक रोज मरणाशी दोन हात करतात. एका रहिवाशाने सांगितले की, जीव वाचविण्यासाठी ज्यात आश्रय घेतला जातो तो बंकर उडवून देण्याची ताकद तोफगोळ्यांमध्ये असते. त्यामुळेच या रहिवाशांना सतत भीतीच्या छायेत वावरावे लागते. 

वैष्णोदेवी यात्रेवर परिणाम

तणावाचा परिणाम माता वैष्णोदेवीच्या यात्रेवरही झाला आहे. ६ मे रोजी देशभरातून १२,९१७ भाविक कटऱ्यात दाखल झाले होते, तर ७ मे रोजी म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या दिवशी ही संख्या १२,७६० होती. त्यानंतर भाविकांच्या संख्येत मोठी घट झाली. ८ मे रोजी ८,६७०, ९ तारखेला ३,९६२, १० मे रोजी केवळ १,३५२, ११ तारखेला १,३०३, १२ मे रोजी १,६५८ व १३ मे रोजी २,८०८ भाविकांनी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. ७ दिवसांनंतर हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू झाली आहे. 

 

Web Title: pahalgam 5000 horsemen 600 drivers unemployed after terrorist attack tourists left and kashmiri in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.