'पद्मावत'च्या प्रदर्शनावर बंदी घालणाऱ्या 4 राज्यांविरोधात सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 12:30 PM2018-01-25T12:30:26+5:302018-01-25T12:36:07+5:30

संजय लीला भन्साळी यांचा वादग्रस्त 'पद्मावत' सिनेमा चार राज्य वगळता देशभरात प्रदर्शित करण्यात आला आहे.

Padmaavat row contempt Petition filed against four states in supreme court | 'पद्मावत'च्या प्रदर्शनावर बंदी घालणाऱ्या 4 राज्यांविरोधात सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल

'पद्मावत'च्या प्रदर्शनावर बंदी घालणाऱ्या 4 राज्यांविरोधात सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल

Next

नवी दिल्ली - संजय लीला भन्साळी यांचा वादग्रस्त 'पद्मावत' सिनेमा चार राज्य वगळता देशभरात प्रदर्शित करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने पद्मावत संपूर्ण देशात प्रदर्शित करण्याचा निर्णय दिलेला असतानाही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्यात सिनेमा प्रदर्शित करण्यात आलेला नाही. 

देशभरातील 75 टक्के मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांचे प्रतिनिधित्व करणा-या ‘मल्टिप्लेक्स असोसिएसन ऑफ इंडिया’ या संघटनेने संभाव्य हिंसाचाराची भीती लक्षात घेऊन राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ हा चित्रपट न दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष दीपक अशर यांनी सांगितले की, या राज्यांमध्ये सुरू झालेला व होऊ शकणारा हिंसाचार पाहता, प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी आमचे सदस्य हा चित्रपट त्यांच्या मल्टिप्लेक्समध्ये दाखविणार नाहीत. तसंच प्रशासनाकडूनही हिंसाचार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

राजस्थान, गुजरात, हरियाणामध्ये या राज्यांमध्ये पद्मावतविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्यामुळे सुप्रीम कोर्टात या राज्यांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.


करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी या राज्यांमध्ये विविध ठिकाणी विरोधाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केल्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना अपयश आल्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. सोबत न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी करणी सेनेच्या तीन कार्यकर्त्यांविरोधातही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

'पद्मावत'ला विरोध करणाऱ्या करणी सेनेचा शाळेच्या बसवर हल्ला
लज्जास्पद आणि तितकीच संतापजनक बाब म्हणजे 'पद्मावत' सिनेमाला विरोध करणाऱ्या कथित संस्कृती रक्षकांनी बुधवारी(24 जानेवारी) गुरुग्राममध्ये चक्क लहान मुले असलेल्या एका शाळेच्या बसवर हल्ला केला. बसमधील सीटचा आसरा घेत शाळकरी विद्यार्थी आणि शाळेच्या कर्मचा-यांनी कसेबसे स्वतःला या हल्ल्यातून वाचवलं. जमावाने दगड आणि काठ्यांनी बसच्या खिडकीच्या काचा फोडल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार घडला तेव्हा बसमध्ये नर्सरी ते आठवी इयत्तेचे एकूण दहा विद्यार्थी होते. तसेच बसमध्ये एक शिक्षक, कंडक्टर आणि मदतनीसही होता. ही बस जात असलेल्या रस्त्यावर जमावाने आधीच हरियाणा वाहतूक विभागाच्या बसला पेटवली होती. त्यानंतर जमावाने शाळेच्या बसवरही हल्ला केला.  मात्र, कुणालाही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 

संजय लीला भन्साळींच्या घराबाहेर वाढवली सुरक्षा 

‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित होण्याच्या पूर्वसंध्येला ठाणे आणि डोंबिवलीत खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करणा-या करणी सेना, राजपूत सेना तसेच हिंदू सेनेच्या सुमारे ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या दीपिका पादुकोण, शाहिद कपूर, रणवीर सिंह, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घराबाहेरही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. ‘पद्मावत’ सिनेमाविरोधात बुधवारी (24 जानेवारी) ठाणे आणि डोंबिवली शहरात करणी सेना, राजपूत सेना तसेच हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातून सुमारे २०, तर डोंबिवलीतही १५ ते २० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, पोलीस बंदोबस्तात चित्रपटाचा खेळ सुरळीत सुरू ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.








Web Title: Padmaavat row contempt Petition filed against four states in supreme court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.