मोरबी दुर्घटनेवर ना माफी, ना राजीनामा; दिल्लीहून ऑपरेट होतंय गुजरात सरकार, पी. चिदंबरम भाजपावर बरसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 14:07 IST2022-11-08T14:06:32+5:302022-11-08T14:07:46+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मोरबी पूल दुर्घटनेवरुन भाजपावर जोरदार टीका केली.

मोरबी दुर्घटनेवर ना माफी, ना राजीनामा; दिल्लीहून ऑपरेट होतंय गुजरात सरकार, पी. चिदंबरम भाजपावर बरसले
नवी दिल्ली-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मोरबी पूल दुर्घटनेवरुन भाजपावर जोरदार टीका केली. मोरबी पूल दुर्घटनेत आतापर्यंत भाजपाकडून ना कुणी माफी मागितली ना कुणी राजीनामा दिला. या दुर्घटनेत १३५ लोकांचा मृत्यू झाला होता. गुजरातमध्ये प्रसाराचासाठी आलेल्या पी. चिदंबरम यांनी गुजरात सरकार दिल्लीहून चालवलं जात असल्याचा आरोप केला.
गुजरातमध्ये एक आणि पाच डिसेंबर रोजी दोन टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. मोरबीत ब्रिटीश कालीन केबल पूल ३० ऑक्टोबर रोजी कोसळला होता. यात १३५ जणांचा मृत्यू झाला. एका खासगी कंपनीकडून या पुलाच्या दुरूस्तीचं काम केलं गेलं होतं आणि चारच दिवसांनी ही दुर्घटना घडली होती.
"मोरबी दुर्घटनेबाबत जितकं मला माहित आहे त्यानुसार आतापर्यंत या घटनेसाठी सरकारकडून ना कुणी माफी मागितली आणि ना कुणी राजीनामा दिला आहे. हिच घटना जर परदेशात घडली असती तर तातडीनं राजीनामे घेण्यात आले असते. आगामी निवडणूक सहजपणे जिंकू असं भाजपाला वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी या घटनेसाठी जनतेला उत्तर देणं त्यांना महत्वाचं वाटत नाही. गुजरातचं सरकार मुख्यमंत्री नव्हे, तर दिल्लीतून चालवलं जात आहे", असं पी. चिदंबरम म्हणाले.
काँग्रेसला संधी देण्याचं केलं आवाहन
"ज्या राज्यांमध्ये लोक सरकारला पराभूत करतात, त्यांना जबाबदारीची जाणीव असते वाटते. मी गुजरातच्या जनतेला आवाहन करतो की हे सरकार बदला आणि काँग्रेसला संधी द्या. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या केंद्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या नोकर असल्याचसारख्या वागत आहेत. या संस्थांनी अटक केलेल्यांपैकी ९५ टक्के विरोधी पक्षांचे राजकारणी आहेत", असंही पी. चिदंबरम म्हणाले.