...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 09:43 IST2025-07-01T09:42:27+5:302025-07-01T09:43:09+5:30
Air India plane: अहमदाबादमध्ये हा विमान अपघात घडल्यानंतर अवघ्या ३८ तासांमध्येच दिल्लीमध्ये एअर इंडियाचं आणखी एक विमान अशाच अपघातातून थोडक्यात बचावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना १४ जून रोजी सकाळी घडली.

...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
जून महिन्यात १२ तारखेला गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्याविमानाला एक भीषण अपघात झाला होता या अपघातात विमानातील प्रवासी आणि आणि कर्मचारी असे मिळून २४१, तर विमान कोसळले त्या परिसरातील इमारती आणि रस्त्यांवर असलेले ३४ जण असे मिळून सुमारे २७५ जण मृत्युमुखी पडले होते. दरम्यान, अहमदाबादमध्ये हा विमान अपघात घडल्यानंतर अवघ्या ३८ तासांमध्येच दिल्लीमध्येएअर इंडियाचं विमान अशाच अपघातातून थोडक्यात बचावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना १४ जून रोजी सकाळी घडली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार दिल्ली येथून व्हिएन्ना येथे जाणाऱ्या एअर इंडियाच्या १८७ या विमानाने उड्डाण करताच इशारे देण्यास सुरुवात केली होती. बोईंग ७७७ प्रकारच्या या विमानाने दिल्ली येथून उड्डाण करताच स्टॉल वॉर्निंग, ग्राऊंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टिम ची डोंट सिंक वॉर्निंग कॉकपिटमध्ये मिळू लागली. याचाच अर्थ हे विमान उंचीवरून वेगाने खाली येऊ लागले होते.
फ्लाईट ट्रॅकिंग संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार बोईल ७७७ विमान व्हीटी-एएलजेने १४ जून रोजी सकाळी २ वाजून ५६ मिनिटांनी उड्डाण केले. विमानाने उड्डाण केले तेव्हा दिल्लीमध्ये वादळी वारे वाहत होते. तसेच हवामान खराब होते. दरम्यान, हे विमान वेगाने खाली येऊ लागले. उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हे विमान सुमारे ९० फुटांपर्यंत खाली आले.
याचदरम्यान, स्टिक शेकर अलार्मसुद्धा सक्रिय झाला. म्हणजेच कॉकपिटमधील कंट्रोल कॉलम हलू लागला. तसेच वैमानिकांना संभाव्य धोक्याची जाणीव तातडीने करून देण्यात आली. त्यानंतर वैमानिकांनी परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवत विमानाला योग्य उंचीवर आणलं आणि प्रवास सुरू ठेवला. ही धोकादायक परिस्थिती काही मिनिटांसाठीच निर्माण झाली असली तरी वैमानिकांनी वेळीच प्रसंगावधान राखलं नसतं तर परिस्थिती धोकादायक बनून मोठी दुर्घटना घडली असती. त्यानंतर हे विमान नऊ तास आणि ८ मिनिटे प्रवास करत व्हिएन्नामध्ये सुखरूपरीत्या उतरले. तिथे काही वेळाने नवे कर्मचारी आले. त्यानंतर हे विमान टोरांटो येथे रवाना झाले.
दरम्यान, वैमानिकांकडून जो अहवाल देण्यात आला. त्यामध्ये केवळ उड्डाण केल्यानंतर वादळामुळे स्टिक शेकर सक्रिय झाला होता, असं म्हटलं होतं. मात्र इतर इशाऱ्यांबाबत माहिती देण्यात आली नव्हती. जेव्हा डीजीसीएने घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन, विमानाच्या फ्लाईट डेटा रेकॉर्डरची तपासणी केली, तेव्हा जीपीडब्ल्यूएस डोंट सिंक आणि स्टॉल वॉर्निंगसारखे गंभीर इशारे देण्यात आले होते, असेही समोर आले. त्यानंतर डीजीसीएने या प्रकाराची गंभीर दखल घेत एअर इंडियाच्या हेड ऑफ सेफ्टी यांना त्वरित बोलावून घेतले. तसेच या विमानाच्या दोन्ही वैमानिकांना कामावरून बाजूला करण्यात आलं.