इतर आरोपीही लक्ष्य?
By Admin | Updated: March 8, 2015 01:32 IST2015-03-08T01:32:19+5:302015-03-08T01:32:19+5:30
दिमापूर येथील भीषण घटनेनंतर नागालँडमधील स्थिती तणावपूर्ण असून, बलात्काराचे इतर आरोपी जनतेच्या निशाण्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इतर आरोपीही लक्ष्य?
कोहिमा : बलात्काराच्या आरोपीला जमावाने कारागृहातून बाहेर खेचून आणून ठेचून मारल्याच्या दिमापूर येथील भीषण घटनेनंतर नागालँडमधील स्थिती तणावपूर्ण असून, बलात्काराचे इतर आरोपी जनतेच्या निशाण्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी या घटनेचे खापर केंद्रीय सुरक्षा दलांवर फोडले आहे, तर नागालँडचे मुख्यमंत्री टी. आर. झेलियांग यांनी राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे काटेकोर पालन केले जाईल, असे आश्वासन दिले आहे.
आरोपीला जमावाने ठार केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्राला आपला अहवाल पाठवला आहे. त्यात म्हटले आहे की, राज्यात इतरही अनेक तुरुंगांच्या ठिकाणी अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. राज्यातील स्थिती तणावपूर्ण असली तरी राज्य सरकारच्या अहवालाने केंद्राची चिंता वाढवली आहे.
दरम्यान, आरोपीला ठार करण्याच्या घटनेचे खापर केंद्रीय दलांवर फोडण्यात आले आहे. आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई गुवाहाटी येथे म्हणाले की, कारागृहाला केंद्रीय दलांची सुरक्षा होती. ती कुचकामी ठरल्यामुळेच हा प्रकार घडला. प्रत्येक कैद्याच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्राची आहे.
गोगोई यांनी नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्या राज्यातील आसामी लोकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी विनंती केली आहे. जमावाने ज्या आरोपीला ठार केले तो सईद फरीद खान आसामच्या करीमगंज जिल्ह्यातील बदरपूर येथील रहिवासी होता. नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनीही कायदा-सुव्यवस्था राखली जाईल, असे आश्वासन दिले आहे. या प्रकरणातील दोषीवर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. उपायुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना निष्काळजीपणाबद्दल निलंबित करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
च्नागालँडचे व्यावसायिक केंद्र असलेल्या दिमापूर येथे मागील दोन दिवसांत कुठलाही अनुचित प्रकार घडला नसला तरी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक अकितो सेमा यांनी सांगितले की, या घटनेनंतर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आयआरबीच्या ११ कंपन्या आणि सीआरपीएफच्या ३ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. ५ मार्च रोजी घडलेल्या घटनेसंदर्भात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
च्रस्त्यावर नंबर प्लेट नसलेल्या अनेक गाड्या पडलेल्या दिसत आहेत. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडे पुरेसे पुरावे आहेत. या घटनेचे व्हिडिओ क्लिपिंग हाती लागले आहेत. त्यामुळे आरोपींना अटक करणे फारसे अवघड नाही. शहरातील स्थिती सुधारेपर्यंत जमावबंदी आदेश लागू राहील. आम्ही आता कसलीही स्थिती हाताळण्यास सज्ज आहोत, असे सेमा यांनी सांगितले.