लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना हटवण्यासाठी विरोधक ठराव मांडणार; संसदेत वातावरण तापणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 08:09 IST2026-02-10T08:08:32+5:302026-02-10T08:09:07+5:30

राहुल गांधी यांना लोकसभेत बोलण्याची संधी नाकारल्याच्या निषेधार्थ उचलले पाऊल

Opposition to move resolution to remove Lok Sabha Speaker Om Birla; atmosphere in Parliament to heat up | लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना हटवण्यासाठी विरोधक ठराव मांडणार; संसदेत वातावरण तापणार

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना हटवण्यासाठी विरोधक ठराव मांडणार; संसदेत वातावरण तापणार

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शन प्रस्तावावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलण्याची संधी नाकारल्याच्या निषेधार्थ लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून दूर करण्यासाठी ठराव मांडण्याचा निर्णय विरोधकांनी सोमवारी घेतला. हा ठराव संविधानाच्या कलम ९४-क अंतर्गत मांडण्यात येणार आहे.

आभार प्रस्तावावर बोलण्यास विरोधी पक्षनेत्यांना परवानगी न देणे, भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्याविरोधात कारवाई सुरू न करणे, काँग्रेसच्या महिला खासदारांवर निराधार आरोप करणे तसेच आठ विरोधी खासदारांचे निलंबन करणे, या कारणांवरून अध्यक्षांना हटवण्यासाठी  ठराव मांडण्याची नोटीस दिली जाईल. सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कक्षात झालेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सप आणि तृणमुल काँग्रेसला मात्र चर्चेत सहभागी व्हायचे आहे. 

राहुल यांनी बिर्लांशी केली चर्चा
राहुल गांधी यांनी सोमवारी काही विरोधी पक्षनेत्यांसह लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांची भेट घेतली. लोकसभेतून निलंबित केलेल्या ८ काँग्रेस खासदारांचा मुद्दा तसेच महिला खासदारांवर करण्यात आलेल्या आरोपांसह संसदेसंबंधी इतर मुद्दे मांडण्याची इच्छा गांधी यांनी बिर्ला यांच्याकडे व्यक्त केली.

राज्यसभेतही विरोधी पक्षांनी केला सभात्याग
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना सोमवारी सभागृहात बोलण्याची परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी सभात्याग केला. शून्य प्रहराच्या समाप्तीनंतर प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेस नेते खरगे यांनी बोलण्याची परवानगी मागितली. परंतु, सभापतींनी ती नाकारल्याने विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. लोकसभेत राहुल गांधी यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्याची परवानगी नाकारल्याचा विषय या सभागृहात उपस्थित केला जाऊ नये, असे सभापतींनी बजावले. 

... तसा कोणताही निर्णय झाला नाही - रिजिजू
संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, लोकसभा अध्यक्ष, विरोधी पक्षांच्या खासदारांच्या चर्चेत राहुल गांधी दावा करतात तसा कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच विरोधी पक्षनेत्यांना लोकसभा अध्यक्षांबद्दल बोलायचे असेल तर ओम बिर्ला हेही उत्तर देण्यासाठी सभागृहात उपस्थित असणे आवश्यक आहे. तसेच केंद्रीय अर्थसंकल्पावर अन्य खासदार बोलण्यास तयार आहेत. त्यामुळे त्यांना संधी देऊन सभागृहात अर्थसंकल्पावर व्यापक चर्चा होऊ शकते.  मात्र, राहुल यांच्या मुद्द्यावर विरोधक ठाम होते. 

अर्थसंकल्पावरील चर्चेआधी राहुल यांच्या भाषणाचा पेच
केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलण्याची परवानगी द्यावी, या मागणीवरून सरकार आणि विरोधकांमध्ये निर्माण झालेल्या संघर्षामुळे सोमवारी लोकसभा  तहकूब करण्यात आली. सभागृहाची बैठक सुरू झाली, तेव्हा पीठासीन अधिकारी असलेल्या संध्या राय यांनी  सांगितले की राहुल गांधींना अर्थसंकल्पावर बोलायचे असल्यास त्याला कोणतीही हरकत नाही. गांधी म्हणाले की, अर्थसंकल्पावरील चर्चेपूर्वी मला काही मुद्दे मांडण्याची परवानगी दिली जाईल असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि काही विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये झालेल्या बैठकीत ठरले होते.
मात्र, लोकसभा अध्यक्षांनी मात्र तो निर्णय अमलात आणलेला नाही. त्यावर पीठासीन अधिकारी संध्या राय म्हणाल्या की, अशा कोणत्याही निर्णयाची मला माहिती नाही. तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता कोणालाही अन्य कोणताही विषय मांडण्याची परवानगी देता येणार नाही. 

Web Title : लोकसभा अध्यक्ष ओम बिरला को हटाने के लिए विपक्ष लाएगा प्रस्ताव

Web Summary : राहुल गांधी को बोलने का मौका न देने पर विपक्ष लोकसभा अध्यक्ष ओम बिरला को हटाने का प्रस्ताव लाएगा। विपक्षी दलों की बैठक में यह फैसला हुआ। राज्यसभा में भी इसी मुद्दे पर विरोध प्रदर्शन हुआ।

Web Title : Opposition to move resolution to remove Lok Sabha Speaker Om Birla.

Web Summary : Opposition plans to move a resolution to remove Lok Sabha Speaker Om Birla over denial of speech to Rahul Gandhi and other issues. This decision was made at a meeting of opposition leaders. Rajya Sabha also saw protests over a similar issue.