कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 15:37 IST2025-08-12T15:36:18+5:302025-08-12T15:37:44+5:30
बिहारमध्ये मतदार यादीच्या सुधारणेविरुद्ध विरोधी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मंगळवारी संसदेबाहेर एक अनोखा निषेध पाहायला मिळाला.

कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
बिहारमध्ये मतदार यादीच्या सुधारणेविरुद्ध विरोधी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मंगळवारी संसदेबाहेर एक अनोखा निषेध पाहायला मिळाला. यात काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांच्यासह अनेक विरोधी नेते एका महिलेच्या फोटोसह मिंता देवी असे लिहिलेले टी-शर्ट घालून दिसले. या टी-शर्टच्या मागे ट१२४ नॉट आउट असे लिहिण्यात आले. दरम्यान, सिवान जिल्ह्यातील निवडणूक आयोगाच्या निष्काळजीपणामुळे पहिल्यांदाच एका १२४ वर्षीय महिलेचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
हे संपूर्ण प्रकरण दरौंडा विधानसभा मतदारसंघातील सिसवान ब्लॉकच्या सिसवा कला पंचायतीच्या अर्जनीपूर गावाचे आहे. या गावातील मतदार यादीत मिंता देवी नावाच्या १२४ वर्षीय महिलेचे नाव नोंदवण्यात आले. पहिल्यांदाच या महिलेचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले. एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, अर्जनीपूर गावातील रहिवासी धनंजय कुमार सिंह यांच्या पत्नी मिंता देवी यांचे खरे वय फक्त ३५ वर्षे आहे. बूथ लेव्हल ऑफिसर उपेंद्र शाह यांनीही डेटा एन्ट्री करताना ही चूक झाल्याचे मान्य केले. ऑनलाइन फॉर्म भरताना वयात चूक झाली. त्यामुळे त्यांचे वय १२४ दाखवले जात आहे, यात दुरूस्ती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी बिहार मतदार यादीच्या संपूर्ण प्रक्रियेतील पारदर्शकता आणि अचूकतेबद्दल शंका उपस्थित केली. बिहारमध्ये जारी केलेल्या एसआयआरबाबत आधीच वाद आहे, जिथे मोठ्या संख्येने मतदारांचे नावे काढून टाकले जात आहेत. शिवाय, चुकीच्या नोंदी समोर आल्या आहेत. अशा चुका होत असतील तर त्याचा निवडणुकीच्या निष्पक्षतेवर आणि मतदार यादीच्या विश्वासार्हतेवर परिणाम होईल, असे विरोधी पक्षातील खासदारांचे म्हणणे आहे. यावर निवडणूक आयोगाने तांत्रिक चुका सामान्य आहेत आणि त्या दुरुस्त केल्या जाऊ शकतात, असे स्पष्टीकरण दिले.