Opinion Poll: ...तर यूपीए ठरणार एनडीएपेक्षा वरचढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 22:21 IST2018-10-04T22:21:18+5:302018-10-04T22:21:34+5:30
काँग्रेसने देशभरात प्रादेशिक पक्षांशी आघाड्या केल्यास त्यांना अडीचशेच्या आसपास जाता येईल. तर सध्या सव्वा तीनशेजवळ असणारा एनडीए सव्वा दोनशेपर्यंत येईल.

Opinion Poll: ...तर यूपीए ठरणार एनडीएपेक्षा वरचढ
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसनं देशभरात विविध पक्षांसोबत आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसला जवळपास सर्व राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी करावी लागेल, असा अंदाज एबीपी माझा आणि सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेसने देशभरात प्रादेशिक पक्षांशी आघाड्या केल्यास त्यांना अडीचशेच्या आसपास जाता येईल. तर सध्या सव्वा तीनशेजवळ असणारा एनडीए सव्वा दोनशेपर्यंत येईल.
कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात विरोधी पक्षांचे दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर दिसले होते. त्यावेळी व्यासपीठावर सोबत असलेल्या पक्षांनी आगामी निवडणुकीतही साथ द्यावी, यासाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू आहे. काँग्रेसच्या या प्रयत्नांना यश आल्यास आणि प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी झाल्यास त्याचा मोठा फायदा पक्षाला होईल. राज्यात राष्ट्रवादी, उत्तर प्रदेशात महाआघाडीची साथ मिळाल्यास यूपीए 244 पर्यंत मजल मारू शकते. मात्र यासाठी काँग्रेसला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यांसोबतच आसाम, बिहार, झारखंड, कर्नाटक, पश्चिम बंगालमध्येही प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करावी लागेल.
काँग्रेसने प्रादेशिक पक्षांसोबत हातमिळवणी केल्यास त्याचा मोठा फटका भाजपाप्रणित एनडीएला बसेल, असा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेसने देशभरात छोट्या पक्षांशी आघाड्या केल्यास यूपीएला 244 जागा मिळतील. मात्र एनडीएच्या जागा 228 वर येतील. सत्ता स्थापनेसाठी 272 जागा आवश्यक असतात. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सत्ता स्थापनेसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळू शकते.