ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:48 IST2025-05-08T12:47:36+5:302025-05-08T12:48:03+5:30
Indian Air Force: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेजवळ सातत्याने गोळीबार करत आहे.

ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
Operation Sindoor: भारताने मंगळवारी मध्यरात्री पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेवर हल्ला करुन दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तान नियंत्रण रेषेवर सतत गोळीबार करत आहे. या गोळीबारात अनेक भारतीयांचा मृत्यूही झाला आहे. सीमेपलीकडून झालेल्या या भ्याड हल्ल्यामुळे केंद्र सरकारने भारतीय हवाई दलाला आता पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जातोय की, सरकारने हवाई दलाला स्पष्टपणे निर्देश दिले आहे की, जर त्यांना काही संशयास्पद दिसले, तर ते पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. डोभाल नुकतेच पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठकही होणार आहे. या बैठकीत सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी होतील.
देशभरातील 27 विमानतळे बंद
ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरातील 27 विमानतळे सध्या बंद करण्यात आली आहेत. यातील बहुतांश विमानतळ उत्तर भारत आणि पश्चिम भारतात आहेत. यामध्ये श्रीनगर, जम्मू, चंदीगड, अमृतसर आणि लुधियाना येथील विमानतळांचा समावेश आहे.
पाकचा नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार
मंगळवारी झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर बुधवारी (7 मे) पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील (LOC) गावांना लक्ष्य करून जोरदार गोळीबार केला. या हल्ल्यात चार मुले आणि एका सैनिकासह 13 जणांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्यानेही याला चोख प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्यात.
अनेक गावे रिकामी करण्यात आली
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील काही सीमावर्ती गावांसह इतर सीमावर्ती गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले आहे.